“विद्यार्थी सेवा प्रतिष्ठान या ज्ञानरूपी रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर करा : डॉ. गणपती कमळकर

वेंगुर्ले l प्रतिनिधी :विद्यार्थी सेवा प्रतिष्ठान सिंधुदुर्ग आयोजित शिष्यवृत्ती सराव परीक्षा विद्यार्थी गुणगौरव समारंभ लेमन ग्रास हॉटेल कुडाळ येथे मान्यवर तसेच विद्यार्थी, पालक व शिक्षक यांच्या बहुसंख्य उपस्थितीत मोठ्या दिमाखात पार पडला. या कार्यक्रमांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 69 गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना गौरवचिन्ह, सन्मानपत्र, रोख बक्षिस आणि उपयुक्त पुस्तक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

विद्यार्थ्यांप्रती आपली सेवा समर्पित करण्याच्या उदात्त हेतूने जिल्ह्यातील समविचारी शिक्षक परिवाराने विद्यार्थी सेवा प्रतिष्ठानची मुहूर्तमेढ रोवली. सदस्यांच्या स्वयं देणगीतून अल्पावधीत नियोजन करून जिल्हास्तरावर शिष्यवृत्ती सराव परीक्षा आयोजित करण्यात आली. उच्च दर्जाची प्रश्न निर्मिती आणि गुणवत्ता यांचा मेळ साधत जिल्ह्यातील आठही तालुक्यात केंद्र संचालक व मित्र परिवाराच्या मदतीने सराव परीक्षा संपन्न झाली .

या शिष्यवृत्ती सराव परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव समारंभाचे उद्घाटन जि.प. सिंधुदुर्गचे प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. गणपती कमळकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यार्थी सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री.कर्पूरगौर जाधव तर प्रमुख अतिथी म्हणून गुरूकुल एज्युकेशन सोसायटी चे संस्थापक श्री. किरण चौगुले, उपशिक्षणाधिकारी श्री. रामचंद्र आंगणे, श्री.शोभराज शेर्लेकर शिक्षक समिती चे राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर शिक्षक संघाचे महेश पालव, जूनी पेन्शन हक्क संघटनेचे राजू वजराटकर, झिलू गोसावी, भोसले एज्युकेशन सावंतवाडी चे प्राचार्य गजानन भोसले उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला एमआयडीसी कुडाळ कुंभारवाडा शाळेतील मुलांनी ईशस्तवन, स्वागतगीत सादर केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून संस्थापक श्री. एकनाथ जानकर यांनी विद्यार्थी सेवा प्रतिष्ठानची, गरज,उद्देश आणि दिशा यांचे विवेचन केले.

विद्यार्थ्यांना संबोधित करत असताना शिक्षणाधिकारी डॉ. गणपती कमळकर यांनी स्पर्धा परीक्षेची गरज आणि त्यासाठी आवश्यक सराव यांचे महत्त्व विशद केले. त्यासाठी विद्यार्थी सेवा प्रतिष्ठानने हाती घेतलेल्या कार्याचा गौरव केला. विद्यार्थी सेवा प्रतिष्ठानची वाटचाल गौरवास्पद असून या ज्ञानरूपी रोपट्याच्या रूपांतर वटवृक्षात करा. असे आवाहन केले. प्रतिष्ठान मधील सदस्य हे सर्व उपक्रमशील शिक्षक असल्याचे पाहून समाधान व्यक्त केले. जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासामध्ये विद्यार्थी सेवा प्रतिष्ठानचे योगदान निश्चितच उल्लेखनीय राहील असे अशी आशा व्यक्त करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

उपशिक्षणाधिकारी श्री.रामचंद्र आंगणे यांनी जिल्हाभरातून आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत विद्यार्थी प्रतिष्ठानच्या कार्याचा विद्यार्थी विकासासाठी असलेल्या योगदानाचा उल्लेख केला आणि भविष्यात आवश्यक ते प्रशासकीय सहकार्य प्रतिष्ठानला मिळेल याची ग्वाही दिली.

याप्रसंगी वंचित घटकांसाठी कार्य करणारे आणि कातकरी समाजातील विद्यार्थ्यांसाठी सतत झटणारे ,त्यांना न्याय हक्क प्राप्त करून देणारे श्री.उदय आईर यांचा विशेष सन्मान विद्यार्थी प्रतिष्ठान तर्फे करण्यात आला. जिल्ह्यातील आठही तालुका संचालक वेंगुर्ला श्री समीर तेंडोलकर, कुडाळ बाबाजी भोई , सावंतवाडी श्री.धोंडी वरक , मालवण श्री.समीर चव्हाण, देवगड श्री.रघुनाथ बोडेकर, वैभववाडी विनोद सरकटे, दोडामार्ग श्री.प्रभाकर राठोड व परीक्षा प्रमुख रामचंद्र झोरे या सर्वांना सन्मानचिन्हे व रोप देऊन सन्मानित करण्यात आले. कणकवली केंद्र संचालक श्री.दिलीप शेळके यांच्या रक्तदान चळवळीतील योगदानाबद्दल विशेष सन्मान करण्यात आला.

विद्यार्थी सेवा प्रतिष्ठानच्या कार्याबद्दल बोलत असताना पालकांनी उत्कृष्ट अशा नियोजन आणि दर्जेदार प्रश्नपत्रिकेंबद्दल गौरवोद्गार काढले.

गुरुकुल एज्युकेशन कोल्हापूरचे अध्यक्ष श्री. किरण चौगुले यांनी उपक्रमाचे कौतुक करत भविष्यात विद्यार्थी हिताच्या सर्व उपक्रमाना आवश्यक ते सहकार्य करण्याची ग्वाही दिली.

अध्यक्षीय भाषणातून श्री. कर्पूरगौर जाधव यांनी प्रतिष्ठानच्या कार्याची गरज आणि महत्त्व सांगून भविष्यातील योजनांचे सुतोवाच करत समाजातील विद्यार्थीप्रिय घटकांच्या सहकार्याचे आवाहन केले.

यावेळी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष श्री पांडुरंग चिंदरकर, सचिव श्री रवींद्रनाथ गोसावी, कार्याध्यक्ष श्री. दिपक बोडेकर, कोषाध्यक्ष श्री. रामचंद्र झोरे, सदस्य श्री. योगेश सकपाळ श्री. राजाराम लोटे श्री. विजय मस्के श्री. सागर लाखे श्री. समीर चव्हाण श्री. समीर तेंडुलकर श्री. जयवंत जोशी, श्री. दत्तगुरु कांबळी श्री. विलास गोसावी श्री. संतोष गोसावी श्री. राजाराम लोटे श्रीम. वैदही गोसावी श्री. रामचंद्र मळगावकर आणि इतर सदस्य उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम. निशा जाधव यांनी तर आभार श्री.समीर चव्हाण यांनी मानले.