CHIPLUN: उक्ताड बेटावरील गाळ उपशाचे काम पूर्णत्वाकडे

Sludge removal work on Uktad Island nears completion

गोवळकोटमधील काम सुरू करण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न

चिपळूण(प्रतिनिधी):- ः पूरमुक्त चिपळूणचे ध्येय घेऊन नाम फाऊंडेशन वाशिष्ठी नदीतील गाळ उपशासाठी दिवस-रात्र झटत आहे. पावसाळा जवळ येऊन ठेपल्याने उक्ताड व पेठमाप येथील कामाकडे विशेष लक्ष केंद्रीत करीत येथे मोठी यंत्रणा तैनात ठेवली आहे. त्यांच्या अथक परिश्रमातून उक्ताड बेट परिसरातील गाळ काढण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून पेठमाप बेट येथील काम अवघे वीस टक्केच शिल्लक राहिल्याची माहिती मिळत आहे. या दोन्ही कामांची पालिकेचे मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी अधिकाऱ्यांसह रविवारी पाहाणी करीत आढावा घेतला.

चिपळूण बचाव समिती, प्रशासन, जलसंपदा विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या नाम फाऊंडेशनकडून उक्ताड बेट व पेठमाप बेट येथे गाळ उपशाचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. यासाठी 5 पोकलेन व 21 डम्पर कार्यरत आहेत. तर काही स्थानिकांच्या विरोधामुळे गोवळकोट धक्का येथील गाळ उपशाचे काम नामने थांबविले आहे. या परिसरातील यंत्रणा काम सुरू असलेल्या ठिकाणी हलविण्यात आली आहे. सध्या उक्ताड येथील गाळ काढण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. बेटाचा एक तुकडा आणि बनवलेला रस्ता हे काढणे शिल्लक आहे. पेठमाप येथील बेटावरचा काढलेल्या गाळापैकी 80 टक्के गाळ इतर ठिकाणी हलवण्यात आला आहे. 20 टक्के काम शिल्लक आहे. गोळकोट येथील काम सध्या बंद असून येथील नागरिक हे काम पुन्हा सुरू करण्याची मागणी करत आहेत. दरम्यान, रविवारी मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे, पालिकेतील अभियंता व सामाजिक कार्यकर्ते गुलमोहम्मद शाह यांनी उक्ताड व पेठमाप येथील गाळ उपसा कामांची पाहाणी केली. तसेच कामाचाही आढावा घेतला. चिपळूणमध्ये सुरू असलेल्या गाळ उपसा कामासाठी नागरिकांनी जास्तीत जास्त सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी मुख्याधिकाऱ्यांनी केले.

चौकट-

गोवळकोट येथील कामासाठी आमदार शेखर निकम यांचे जोरदार प्रयत्न

काही स्थानिकांनी गाळ वाहतूक करणारे डम्पर रोखल्याने आणि कामात सातत्याने अडचणी निर्माण केल्या जात असल्याने नाम फाऊंडेशनने गोवळकोट धक्का येथील गाळ उपशाचे काम थांबविले आहे. गेले सहा दिवस हे काम बंदच आहे. येत्या काही दिवसात पावसाळा सुरू होईल. त्यानंतर गाळ काढण्याचे काम थांबणार आहे. त्यामुळे येथील काम पुन्हा सुरू व्हावे यासाठी आमदार शेखर निकम, मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. आमदार निकम यांनी यासंदर्भात नाम फाऊंडेशनचे मल्हार पाटेकर यांच्याशी संपर्क साधत चर्चा केल्याचे समजते.

.