माझं हे जीवन जनतेसाठी समर्पित : आ. दीपक केसरकर 

आ. केसरकरांच्या हस्ते १३ रुग्णवाहिकांचे लोकार्पण 

सावंतवाडी । प्रतिनिधी : राजकारण हे निवडणुकांपुरतं असतं. पदाला चिकटून राहणारा मी नाही. यापुढे निवडणूक लढवण्याची माझी इच्छा नाही. केवळ जनतेची सेवा करणे हेच मी माझं कर्तव्य समजतो. याच जनतेच्या आशीर्वादाने काही दिवसांपूर्वी मला पुनर्जन्म मिळाला. त्यामुळे माझं हे जीवन मी जनतेसाठी समर्पित करत आहे, असे भावोद्गार माजी शालेय शिक्षण मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी काढले.     

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील रुग्णांच्या सेवेसाठी महाराष्ट्र आणि सिंधुदुर्ग दिनाचे औचित्य साधून आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते १३ रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आलं. बॅ. नाथ पै सभागृहात हा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी रुग्णवाहिका दिल्याबद्दल त्यांनी अंबर तिंबलो यांचे आभार व्यक्त केले.

यावेळी केसरकर म्हणाले, “राजकारण हे लोकांसाठी असतं, ते स्वतःसाठी नसतं. मतं मिळावीत म्हणून चार रुग्णवाहिका आणून चार हजार लोकं गोळा करणारी लोकं आम्ही पाहिली आहेत. मात्र, आम्ही यापूर्वी ९ रुग्णवाहिका दिल्या होत्या. ८० टक्के समाजकारण हा विचार शिवसेनेचा आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून गावागावात रुग्णवाहिका पोहोचल्या होत्या. शिवसेना म्हणजे सामाजिक कामात अग्रेसर असणारी संघटना आहे. काही जण टीका करतात. पण, माझ्या एका फोनवर १३ रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येत आहेत. येथील रुग्णांना चांगली रुग्णसेवा मिळावी, यासाठी माझा प्रयत्न आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

विविध संस्थांना रुग्णवाहिकांचे वाटप:

यावेळी आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते युवा रक्तदाता संघटना सावंतवाडी, अभिनव फाउंडेशन, गावतळवाडी विकास मंडळ रेडी, गावठणवाडी कला क्रीडा मंडळ ओटवणे, मलबार नेचर क्लब आंबोली, स्वराज्य मंडळ कलंबिस्त, श्री साईबाबा प्रतिष्ठान आजगाव, साटम महाराज मंडळ निरवडे, मातोश्री मंडळ वेंगुर्ला, कोकण गर्जना वेंगुर्ला, ग्रामविकास वेंगुर्ला, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ दोडामार्ग, महामाया नवरात्रोत्सव मंडळ पिकुळे, बाजारपेठ नवरात्रोत्सव मंडळ सावंतवाडी आदी संस्थांना या रुग्णवाहिका सुपूर्द करण्यात आल्या.

 

जनतेची काळजी घेणारा आमदार : संजू परब

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब म्हणाले, “जनतेची काळजी घेणारा आमदार म्हणजे दीपक केसरकर आहेत. यापूर्वी दहा रुग्णवाहिका मतदारसंघात दिल्या होत्या. आज आणखीन १३ रुग्णवाहिका देण्यात येत आहेत. सिंधुरत्न योजनेतून शेतकरी, महिला बचत गट, दशावतार कलावंतांना भरघोस मदत केली आहे. मात्र, कधीही त्यांनी श्रेयवाद केला नाही. अडीच हजार कोटींची कामं दीपक केसरकर यांनी मतदारसंघात केली आहेत. आज ग्रामीण भागात जाऊन आम्ही काम करत आहोत. खुर्चीवर बसून राजकारण करणारे आम्ही नाही.” असे संजू परब यांनी स्पष्ट केले.

यावेळी जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, विधानसभा मतदारसंघ प्रमुख प्रेमानंद देसाई, महिला जिल्हाप्रमुख ॲड. नीता सावंत-कविटकर,जिल्हा बँक संचालक विद्याधर परब, तालुकाप्रमुख बबन राणे, शहरप्रमुख बाबू कुडतरकर, वेंगुर्ले तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, दोडामार्ग तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, माजी नगरसेविका शुभांगी सुकी, देव्या सुर्याजी, गजानन नाटेकर, परीक्षित मांजरेकर, हर्षद डेरे, विनोद सावंत, प्रतीक बांदेकर, दिपाली सावंत आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांनी केले, सूत्रसंचालन हेमंत खानोलकर यांनी तर आभार बाबू कुडतरकर यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येने शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला तसेच नागरिक उपस्थित होते.