पेंडखळे पेंडखळकरवाडीतील ब्राम्हणदेव मंदिर वहाळावरिल लोखंडी साकवाची पुरती दुरावस्था

पावसाळयापुर्वी दुरूस्ती न केल्यास संपर्क तुटण्याची भिती

राजापूर l प्रतिनिधी : तालुक्यातील पेंडखळे येथील पेंडखळकरवाडीतील ब्राम्हणदेव मंदिराजवळील वहाळावर असलेल्या लोखंडी साकवाची पुरती दुरावस्था झाली आहे. गेली तीन वर्षे या साकवाची दुरूस्ती करावी अशी मागणी करून व ग्रामपंचायतीने ठराव करूनही संबधित विभागाला अद्याप जाग आलेली नाही. त्यामुळे यावर्षी जर या साकवाची दुरूस्ती झाली नाही तर या भागातील जनतेचा संपर्क तुटणार असून शाळकरी विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होणार आहे.

पेंडखळे येथील पेंडखळकरवाडीतील ब्राम्हणदेव मंदिराजवळील वहाळावर हा लोखंडी साकव आहे, या साकवारून कायमच पेंडखळे, केळवडे व अन्य भागातुन येणारे ग्रामस्थ ये जा करत असतात. तर शाळकरी विद्यार्थी देखील या साकवारूनच शाळेत जात असतात.

मात्र गेले काही वर्षे या साकवाची अवस्था दयनिय झाली आहे. या साकवाच्या लोखंडी पट्टया पुर्णपणे गंजून गेल्याने त्या कधीही खाली कोसळण्याची भिती आहे. गंजलेल्या या पट्टयांवरून चालल्याने त्या तुटल्यास साकवावरून कोसळण्याचीही भिती आहे. तर दोन्ही बाजुचे लोखंडी आधारही पुर्णपणे गंजून गेले आहेत.

या साकवाची दुरूस्ती करावी अशी गेली तीन वर्षे या गावातील व पेंडखळकरवाडीतील ग्रामस्थ मागणी करत आहेत. याबाबत ग्रामपंचायतीकडुनही ठराव करून साकव दुरूस्तीचा प्रस्ताव संबधित विभागाला पाठविण्यात आलेला आहे. मात्र त्याची दखल या विभागाने घेतलेली नाही. यावर्षी जर का पावसाळयापुर्वी या साकवाची दुरूस्ती झाली नाही तर मात्र हा साकव मोडून पडण्याची भिती असून त्यामुळे या भागातील अनेक वाडयांचा संपर्क तुटणार आहे. तर पावसाळयात शाळेतील विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होणार आहे. तरी याबाबत तातडीने दखल घेऊन या साकवाची दुरूस्ती करावी अशी मागणी या वाडीतील ग्रामस्थांनी केली आहे.