पिंपळवाडी रस्ता डांबरीकरण अपूर्णावस्थेतच

६६ लाखांचा निधी मंजूर, पावसाळ्यापूर्वी काम न झाल्यास छेडणार आंदोलन
खेड(प्रतिनिधी)तालुक्यातील शिरगाव-भोसलेवाडी ते पिंपळवाडी रस्ता डांबरीकरणासाठी अडीच वर्षापूर्वी ६६ लाख ५० हजार रुपयांचा निधी मंजूर झालेला असतानाही अद्याप रस्ता डांबरीकरणाचे काम अपूर्णावस्थेत आहे. पावसाळ्यापूर्वी रस्त्याचे डांबरीकरण न झाल्यास ग्रामस्थांसमवेत आंदोलन छेडण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते काशिनाथ भोसले यांनी दिला आहे.
मंजूर निधीतून सद्यस्थितीत भोसलेवाडी ते अदडसवाडीपर्यंत काही रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे. मात्र, पिंपळवाडीपर्यंत डांबरीकरण व आवश्यक पुलांची कामे अजूनही प्रलंबितच आहेत. पावसाळ्यात पुलावरून पाणी वाहत असल्याने एसटी सेवा बंद होवून विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना फटका बसतो.
डांबरीकरणाअभावी अपूर्णावस्थेत असलेल्या रस्त्यामुळे वाहनचालकांना वाहने हाकताना तारेवरची कसरत करावी लागत असून प्रसंगी अपघात देखील घडत आहेत.
आजारी रुग्णास वाहनातून उपचारासाठी नेताना अडचणी उभ्या ठाकत आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या दुर्लक्षितपणाचा ग्रामस्थांना फटका बसत आहे. ही बाब गांभिर्यान घेवून पिंपळवाडीपर्यंतच्या अपूर्णावस्थेतील रस्त्याचे डांबरीकरण पावसाळ्यापूर्वी करून ग्रामस्थांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.