नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
उत्तम सावंत/ नांदगाव : रात्रीच्या वेळेस शेत व रस्त्यावर दिसणारे गवा रेडे आता नांदगावात सकाळच्या सत्रात घराशेजारी राजरोस फिरू लागल्याने येथील नागरिकांच्या छातीत धडकी भरल्याचे चित्र निर्माण झाले आहे.पाळीव रेड्याप्रमाणे त्याचा वावर पाहून हि समस्या गंभीर व नागरिकांसाठी धोकादायक असल्याचे दिसून येते.
आज पहाटे एक गवा रेडा ओटव फाटा येथून राजरोस पाळीव रेड्याप्रमाणे मार्गक्रमण करत मुस्लिम वाडीत लोकवस्तीच्या घराजवळ पोहचला.हे चित्र या परिसरातील नागरिकांसाठी धोकादायक व छातीत धडकी भरविणारे आहे.गेल्या काही महिन्यांपासून या गवा रेड्यांचा वावर रात्रीच्या वेळी शिरगाव धोपटेवाडी पासून कोळोशी,हडपीड, असलदे ,नांदगाव भागात सुरुच आहे.मात्र आता चक्क सकाळीच यांचा वावर घरपरड्यापर्यंत पोहोचल्याने संपूर्ण परिसरात भितीचे ढग अधिक गडद होत आहेत.तरी यावर संबंधित विभागाने तत्परता दाखवत वेळीच लक्ष घालावे.अन्यथा मोठा धोका संभव आहे.










