इन्सुली रमाईनगरात छत्रपती शाहू महाराजांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन

बांदा । प्रतिनिधी : इन्सुली येथील रमाईनगर येथे भीमगर्जना युवक मंडळाच्या वतीने छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. रमाईनगरमधील प.पू.डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजमंदिरात महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून हा कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष धम्मचारी लोकदर्शी यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याचा आढावा घेतला. ते म्हणाले की, समाजातल्या सर्व स्तरांतील लोकांना विकासाच्या समान संधी मिळाव्यात यासाठी आरक्षण जाहीर करणारे शाहू महाराज हे देशातील पहिले राजा होते. त्यांनी अस्पृश्यता निवारण, महिला पुनर्विवाह, बालविवाह बंदी, स्त्री-केशवपन बंदी आणि शिक्षणाचा अधिकार यांसारख्या आपल्या राज्यात लागू केलेल्या कायद्यांचे महत्त्व विशद केले.

धम्मचारी लोकदर्शी यांनी शाहू महाराजांच्या दूरदृष्टीची महती सांगताना,”डॉ. आंबेडकर हे केवळ अस्पृश्यांचे नव्हे, तर देशाचे पुढारी होतील,” या महाराजांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जाहीर सभेत केलेल्या घोषणेची आठवण करून दिली.

या कार्यक्रमाला मंडळाचे सचिव अरविंद जाधव, संघप्रभा महिला बचत गटाच्या वृषाली जाधव, भांडार प्रमुख सिद्धेश जाधव, आनंद जाधव, दिपेश जाधव, सानिका जाधव, स्मृतीषा जाधव, सृष्टी जाधव, अम्रित जाधव, तेजस जाधव, निसर्ग जाधव, बाबली जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी सिद्धेश जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले आणि कार्यक्रमाची सांगता झाली.