गोविळ मधलीवाडी येथील घटना
लांजा (प्रतिनिधी) घराशेजारील आंब्याच्या कलमावर आंबे काढण्यासाठी चढलेल्या ५१ वर्षीय व्यक्ती कलमाची फांदी तुटल्याने खाली पडून जखमी झाल्याने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना गोविळ मधलीवाडी येथे घडली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार याबाबतची खबर गंगाराम गणपत लाखण( वय ८४ राहणार गोविळ मधलीवाडी) यांनी लांजा पोलिसांना दिली आहे. त्यांचा मुलगा सुहास गंगाराम लाखण (वय ५१ राहणार गोविळ मधलीवाडी) हा दिनांक ५ मे रोजी सायंकाळी आपल्या राहत्या घरासमोरील असलेल्या आंबा कलमाच्या झाडावर आंबे काढण्यासाठी चढत असताना त्याने आंबा कलमाची फांदी हाताने पकडली व एका फांदीवर पाय ठेवला असता त्याने हाताने पकडलेली फांदी तुटल्यामुळे त्याचा तोल जाऊन तो झाडावरून खाली पडला. यामध्ये त्याला मुका मार आणि दुखापत झाली होती. त्यानंतर त्याला उपचारासाठी प्रथम प्राथमिक आरोग्य केंद्र भांबेड येथे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर अधिक उपचारासाठी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या ठिकाणी उपचार सुरू असताना सायंकाळी ४ वाजता त्यांचा मृत्यू झाला होता .
याप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल एस. एस. भूजबळराव हे करत आहेत.
_______________________________________











