दापोली l प्रतिनिधी: -* दापोली तालुक्यातील वणौशी वडवाडी गेली वीस वर्षे रखडलेली सार्वजनिक विहीर अखेर पूर्णत्वास पोहोचत आज वणौशी (वडवाडी) येथील ग्रामस्थांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात उद्घाटन करण्यात आली.
या महत्त्वाच्या विकासकामाच्या उद्घाटनप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री मा. श्री. योगेश कदम हे स्वतः उपस्थित होते. ग्रामस्थांच्या मागणीवर तत्काळ निर्णय घेऊन २१ लाख रुपयांची मंजुरी त्यांनी या विहिरीसाठी दिली होती.
उद्घाटनप्रसंगी बोलताना राज्यमंत्री कदम म्हणाले,
“शिवसेने सोबत नेहमी खंबीरपणे असलेली ही वाडी दीर्घकाळ पाण्याच्या समस्येला तोंड देत होती. ही गरज केवळ विकासाची नव्हे, तर माणुसकीची होती. आणि म्हणूनच ही विहीर मंजूर करताना मी एक जबाबदारी म्हणून हा निर्णय घेतला. आज ही विहीर पूर्ण झाली असून, कामाची गुणवत्ता पाहून समाधान वाटते.”
विशेष म्हणजे विहिरीतून पाणी काढण्याचा अनुभव प्रत्यक्ष राज्यमंत्री कदम यांनी घेतला. आणि तो क्षण ग्रामस्थांसाठी अविस्मरणीय ठरला.
“पाणी ही केवळ सुविधा नसून जीवनाचा मूलभूत हक्क आहे. या पुढेही तुमच्या गावाच्या प्रगतीसाठी मी सदैव कटिबद्ध राहीन,” असं आश्वासन श्री. कदम यांनी यावेळी ग्रामस्थांना दिले.












