खेड मधील धनगर वाड्या पाण्याच्या दृष्टचक्रात  हंडाभर पाण्यासाठी चढावा लागतोय डोंगर !

खेडमध्ये धनगरवाड्यांतील विदारक स्थिती, रस्त्यांचा थांगपत्ता नाही

खेड(प्रतिनिधी)तालुक्यात शुक्रवारी कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे तापलेली जमीन थंड झाली असली तरी पाणीटंचाईची समस्या जैसे थे आहे. घेरारसाळगड येथील ४. तर तिसंगी येथील २ वाड्या तहानत्या असून टँकरच्या पाण्यासाठी प्रशासनाकडे अर्ज दाखत केला आहे. सर्वाधिक पाणीटंचाईची झळ धनगरवाड्यांतील ग्रामस्थांना बसत आहे. रस्त्यांअभावी टैंकर पोहचण्यास अडसर येत आहे. यामुळे हंडाभर पाण्यासाठी ग्रामस्थांना डोंगर चढून पायपीट करावी लागत आहे.

 

तालुक्यात यंदा टंचाईग्रस्त गाव-वाड्यांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे. ही प्रशासनासह ग्रामस्थांसाठी दिलासादायक बाब ठरली आहे. प्रशासकीय यंत्रणेने याबबात वर्षभर राबवलेल्या उपाययोजनांचे हे फलित म्हणावे लागेल मात्र धनगरवाड्यांमध्ये नळपाणी योजना राबवण्यात निर्माण होणाऱ्या अडथळ्यांमुळे पाणीटंचाईची समस्या पाचवीला पुजल्यासारखीच आहे. अवघा दिवस पाण्यासाठी वेचणाऱ्या धनगरवाड्यांतील ग्रामस्थ हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती करत डोंगर चढत आहेत, सद्यस्थितीत चिरणी-धनगरवाडी, खवटी खालची व वरची धनगरवाडी, सवेणी-धनगरवाडी, घेरारसाळगड-धनगरवाडी ग्रामस्थांची तहान टँकरच्या पाण्यावर भागत आहे.

 

या ठिकाणी प्रशासनाकडून एक दिवसाआड टैंकरने पाणीपुरवठा केला जात असला तरी रस्त्यांअभावी टैंकर पोहचण्यास अडसर निर्माण होत असल्याने ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. तिसंगी-धनगरवाडी, घेरारसाळगड-मराडेवाडी येथेही पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाल्याने ग्रामस्थ पाण्यासाठी टाहो आहेत. घेरारसाळगड-पेठवाडी, तांबडवाडी, बौद्धवाडी, तिसंगी-खांडेकरवाडी येथील ग्रामस्थांनी टँकरच्या पाण्यासाठी प्रशासनाकडे अर्ज दाखल केला आहे. या वाड्यांमध्ये ग्रामस्थ अजूनही टँकरच्या प्रतीक्षेत आहेत. संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पंचायत समितीचा पाणी विभागही सतर्क झाला आहे.