खेड(प्रतिनिधी)तालुक्यातील तिसंगीसह घेरारसाळगडातील वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्यास सुरुवात झाल्याने ग्रामस्थांना दिलासा मिळाला. सद्यस्थितीत ११ गावे १४ वाड्यांना एका शासकीय टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
तिसंगी येथील खांडेकरवाडी, धनगरवाडी, घेरारसाळगडातील पेटवाडी, तांबटवाडी, बौद्धवाडी, निमणी-धनगरवाडी येथे पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाल्याने ग्रामस्थांनी टँकरच्या पाणीसाठी प्रशासनाकडे अर्ज दाखल केला होता. पाण्याची भीषणता लक्षात घेत पंचायत समितीच्या पाणी विभागाने तातडीने सर्वेक्षण करत दाखलाही मिळवल्याने टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. रणरणत्या उन्हामुळे तहानलेल्या गाव-वाड्यांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने ग्रामस्थांसह प्रशासन हवालदिल झाले असून टँकरने पाणीपुरवठा करताना कसरत करावी लागत आहे.










