खेड आगारातून बसफेऱ्या अनियमित

खेड (प्रतिनिधी)
येथील बसस्थानकात प्रवाशांसह चाकरमानी आणि बच्चेकंपनीची वर्दळ वाढली आहे. मात्र आगारातून फेऱ्या वेळेवर सुटत नसल्याने प्रवाशांना एक ते दीड तास प्रतीक्षा करावी लागत आहे.
बसस्थानकातून लांबपल्ल्यासह ग्रामीण मार्गावर सुटणाऱ्या अनेक फेऱ्या नियोजित वेळेत सुटत नाहीत. एक ते दीड तास उशिरा सुटत आहेत. शिवाय काही फेऱ्या अचानक रद्द होत आहेत. मुंबईसह मंडणगड, दापोली आणि तालुक्यातील ग्रामीण भागातील बसफेऱ्या विलंबाने मार्गस्थ होत आहेत. गाड्यांची वाट पाहताना खोळंबलेल्या प्रवाशांमधून एसटी प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर ताशेरे ओढत नाराजीचा सूर उमटत आहे. यामुळे आगार प्रशासनाने फेऱ्या नियोजित वेळेत सोडाव्यात अशी मागणी होत आहे.