खेड (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा महामार्गावरील आवाशी फाटा येथे औद्योगिक वसाहत असून वाहनांची व कामगार वर्गाची सतत रेलचेल असते. शिवाय याठिकाणी उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने सतत वाहतूक कोंडी होत आहे. भविष्यात कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी तात्काळ याठिकाणी सिग्नल यंत्रणा बसविण्यात यावी, अन्यथा आवाशी-गुणदे पंचक्रोशीतील तमाम जनता व वाहन चालक-मालक यांच्या समवेत वाहतूक अडविण्यात येईल, असा सणसणीत इशारा सामाजिक कार्यकर्ते व गुणदे येथील सद्गुरू काडसिद्धेवर विद्यालयाचे चेअरमन विक्रांत दत्ताजीराव आंब्रे यांनी दिला आहे.
मुंबई-गोवा महामार्गाच्या कामातील कमालीची दिरंगाई आणि दररोज अनेक अपघातांना निमंत्रण देणारी ढिसाळ यंत्रणा आणि रटाळ तसेच उदासीन कॉन्ट्रॅक्टर यांच्यामुळे महामार्ग पूर्णत्वास जाणार कधी? हा साऱ्यांनाच प्रश्न पडला आहे. हा प्रश्न पडलेला असतानाच लोटे एम.आय.डी.सी.मधील आवाशी -गुणदे फाटा हायवे येथे सिग्नल यंत्रणा तातडीने न बसविल्यास मुंबई गोवा हायवेवरील ट्रॅफिक अडविणार असा इशारा देतानाच त्रस्त शेकडो वाहन चालक -मालक यांना सोबत घेऊन लवकरच उग्र आंदोलन करण्याचा इशाराही विक्रांत आंब्रे यांनी दिला आहे. आतापर्यंत गेल्या तीन-चार महिन्यात शेकडो किरकोळ अपघात झाले, प्रशासन मोठा अपघात होऊनही विभागातील ८ शाळांचे या चौकातून ये-जा करणारे हजारो विद्यार्थी आणि अनेक कंपन्यांचे हजारो कामगार यांच्या मृत्यूची वाट पहात आहे की काय? असा संतापजनक प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. याबाबत जिल्हाधिकारी तसेच पोलिस अधीक्षक यांच्याकडे निवेदन देण्यात आले. खासदार सुनील तटकरे तसेच थेट केंद्रीय बांधकाम मंत्री ना.नितीन गडकरी यांना निवेदन सादर करण्यात आले असल्याचेही आंब्रे यांनी सांगितले.












