सावंतवाडी | प्रतिनिधी : मान्सूनपूर्व पावसाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी दुपारनंतर झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे महावितरण ची बत्ती गुल झाली. सावंतवाडी शहर व ग्रामीण भागातील वीज पुरवठा मंगळवारी दुपारी ४ च्या सुमारास खंडीत झाला होता. शहरात रात्री उशिरा १० नंतर काही भागात वीज पुरवठा सुरू झाला मात्र ग्रामीण भागात तब्बल ११ तास उलटल्यानंतर आज बुधवारी ११.३० च्या वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. झाडांची पडझड झाल्याने व विद्युत वाहिन्यावर झाडे कोसळल्यामुळे विद्युत वाहिन्या तुटून वीज पुरवठा खंडित झाला असल्याची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली. तर ग्रामीण भागात रात्री दहाच्या सुमारास विद्युत पुरवठा काही वेळ सुरू झाल्यानंतर तो खंडित झाला तो पूर्ववत होत नसल्याने याबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता
फॉल्ट मिळतं नाही असे गुळगुळीत उत्तर महावितरण कडून देण्यात आले. तसेच
आम्ही लाईनवर आहोत काम सुरू आहे अशी उत्तरे देखील देण्यात आली.
त्यामुळे मंगळवारी पूर्ण रात्रभर ग्रामीण भागात ग्राहकांना विजपुरवठा उपलब्ध झाला नाही. आधीच उकाड्याचे दिवस व त्यात पावसाळी वातावरण त्यामुळे नागरिक अक्षरश: त्रस्त झाले. तर बुधवारी सकाळी उशिरापर्यंत वीजपुरवठा पूर्ववत झाला नसल्याने ग्रामीण भागात पाण्याच्या मोटर सुरू करता न आल्याने देखील ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
अखेर दुपारी ११.३० च्या सुमारास मळगाव व अन्य काही भागातील विज पुरवठा पूर्ववत करण्यात यश आले. अजून पावसाळा सुरू झाला नाही. तरीही मान्सूनपूर्व पावसाच्या पहिल्याच तडाख्यात महावितरणच्या कारभाराची लक्तरे वेशीवर टांगली गेली. आता जर ही परिस्थिती असेल तर ऐन पावसाळ्यात नेमकी कोणती परिस्थिती उद्भवेल याबाबत वीज ग्राहकांमधून प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे तर महावितरणच्या भोंगळ कारभाराबाबत तीव्र संताप ग्राहक व्यक्त करीत आहेत.









