नउ वर्षाखालील गटात विहंग सावंत तर पंधरा वर्षाखालील गटात सई प्रभुदेसाई आणि अर्णव चव्हाण विजेते
रत्नागिरी – जी. एच. रायसोनी स्मृती रत्नागिरी जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धा २०२५-२६ रा.भा. शिर्के प्रशालेच्या रंजन मंदिर सभागृहात दि. १७ व १८ रोजी रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ संघटनेतर्फे आयोजित केल्या होत्या. सदर स्पर्धांना रायसोनी फौंडेशन तर्फे विशेष सहकार्य लाभले होते. विविध वयोगटांतील खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग, प्रगल्भ खेळी आणि उत्कृष्ट आयोजनामुळे यशस्वीरीत्या पार पडली. या स्पर्धेत विविध गटांमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या विजेत्यांना रोख पारितोषिके आणि आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. ९ वर्षाखालील गटातून दोन मुले व १५ वर्षे वयोगटातून ४ खेळाडूंची निवड महाराष्ट्र राज्य निवड स्पर्धेसाठी करण्यात आली. निवड झालेले खेळाडू राज्यस्तरीय स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतील.
दि. १७ रोजी ९ व १५ वर्षाखालील गटांच्या निवड स्पर्धा खेळवण्यात आल्या. सदर स्पर्धांच्या बक्षीस समारंभाला जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष व ज्येष्ठ बुद्धिबळ खेळाडू सुभाष शिरधनकर व चेसमेन रत्नागिरीचे सचिव व ज्येष्ठ बुद्धिबळ खेळाडू सुहास कामतेकर उपस्थित होते. श्री. कामतेकर यांनी खेळाडूंना निकालाकडे लक्ष न देता खेळाचा जास्तीत जास्त आनंद घेण्याचा सल्ला दिला आणि त्यातूनच उत्तम निकाल येत जातील असे सांगितले. त्यांच्या हस्ते खालीलप्रमाणे विजेत्यांना गौरविण्यात आले.












