नागरिकांचा सुटकेचा निश्वास
सावंतवाडी । प्रतिनिधी : गत चार दिवसांपासून खंडित झालेला सावंतवाडी शहरातील भटवाडी परिसरातील वीजपुरवठा अखेर ७४ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर पूर्ववत करण्यात महावितरणच्या कर्मचाऱ्यांना यश आले आहे. मंगळवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसामुळे आंब्याचे झाड कोसळून वीज तारा व खांब तुटल्याने या भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता, ज्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला.
मंगळवारी सायंकाळच्या सुमारास सावंतवाडी शहर आणि परिसरात जोरदार वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. याच दरम्यान भटवाडी येथील पवन बिल्डिंगजवळ रस्त्यावर एक मोठे आंब्याचे झाड कोसळले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र झाड पडल्याने विजेच्या तारा तुटल्या आणि एक वीज खांबही मोडून पडला, परिणामी भटवाडी परिसरातील वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला. झाड कोसळले त्यावेळी रस्त्यावर वर्दळ नसल्याने मोठी दुर्घटना टळली होती.
गेले चार दिवस भटवाडीतील नागरिक अंधारात होते. वीज नसल्याने पाणीपुरवठा आणि इतर अनेक समस्यांना त्यांना सामोरे जावे लागत होते, ज्यामुळे त्यांचे अतोनात हाल झाले. महावितरणचे अधिकारी, अभियंते आणि कर्मचारी गेल्या चार दिवसांपासून विद्युत प्रवाह पूर्ववत करण्यासाठी अथक प्रयत्न करत होते. भर पावसातही जीवाची बाजी लावून, पंधरा-पंधरा तास काम करत त्यांनी खंडित वीजपुरवठा सुरू करण्याचे आव्हान स्वीकारले होते.
आज शुक्रवारी अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून, भटवाडीतील वीजपुरवठा पुन्हा सुरू झाला आहे. यामुळे येथील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी वीज वितरणचे अधिकारी, अभियंते आणि कर्मचारी यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. त्यांनी भर पावसातही जिवाची बाजी लावून केलेल्या कामाचे कौतुक केले.











