कामगारांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचे निर्देश
चिपळूण (प्रतिनिधी) : रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठ्या औद्योगिक वसाहतींपैकी असलेल्या लोटे एमआयडीसीमध्ये अलीकडेच झालेल्या दोन भीषण रासायनिक दुर्घटनांमुळे जिल्ह्यात चिंता पसरली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांनी एमआयडीसीमध्ये उद्योजक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची सविस्तर आढावा बैठक घेतली.
या बैठकीत मंत्री सामंत यांनी सर्व कंपन्यांनी त्यांच्या कारखान्यांमध्ये सुरक्षेचे नियम काटेकोरपणे पाळावेत आणि कामगारांच्या आरोग्य व सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे ठणकावून सांगितले. दुर्घटना होऊ नयेत यासाठी प्रत्येक कंपनीने आपापली जबाबदारी पार पाडणे आवश्यक आहे. सुरक्षितता यंत्रणा सक्षम करणे ही केवळ शासनाची नाही, तर प्रत्येक उद्योजकाची देखिल जबाबदारी आहे, असे ते म्हणाले. कामगारांसाठी आरोग्य सुविधा विकसित करण्याचे आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले. कामगारांच्या उपचारासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा लवकरच उभारण्यात येतील. एमआयडीसीमध्ये आरोग्य तपासणी शिबिरे, आपत्कालीन सेवा आणि तातडीच्या उपचारांसाठी वैद्यकीय यंत्रणा सज्ज ठेवली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. सामंत यांनी एका महत्त्वाच्या मुद्यावर लक्ष वेधले की, काही कंपन्यांमध्ये कॅन्सरग्रस्त रुग्णांची संख्या वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा रुग्णांवर योग्य उपचार होणे आवश्यक आहे. या रुग्णांचे उपचार खर्च कंपनी मालकांनी ‘स्वामीत्व’ घेऊन उचलावा, ही त्यांच्या नैतिक जबाबदारी आहे, असे ते म्हणाले.
या बैठकीला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार भास्कर जाधव, जिल्हाधिकारी, उद्योग विभागाचे वरिष्ठ अधिकारी, स्थानिक प्रशासकीय अधिकारी आणि विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सर्वच मान्यवरांनी दुर्घटनांचे गांभीर्य ओळखून सुरक्षेच्या उपाययोजनांमध्ये तत्काळ सुधारणा करण्याचे मान्य केले. लोटे एमआयडीसीसारख्या औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या हजारो कामगारांच्या सुरक्षेसाठी ही बैठक निर्णायक ठरली आहे. सरकारच्या आणि उद्योगपर्तीच्या संयुक्त प्रयत्नांद्वारे रत्नागिरी जिल्ह्यात सुरक्षित, आरोग्यदायी आणि उत्तरदायी औद्योगिक वातावरण निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.











