पोटासाठी पावसात सुद्धा रस्त्यावर विकत आहेत माल
चिपळूण (वार्ताहर ): नगरपालिकेने रस्त्यालगेचच्या टपऱ्या आणि खोकेधारकांवरती कारवाई केल्यानंतर त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कुटुंब कसे चालवावे याची चिंता त्यांना असून काही जण मात्र ऊन, वारा आणि पाऊस याची तमा न बाळगता अवकाळी पावसात सुद्धा आपला उदरनिर्वाह करण्यासाठी दिवसभर पावसात उभे राहून धंदा करत आहेत. शेवटी पोटाची खळगी भरण्याचा प्रश्न त्यांच्यासाठी महत्वाचा आहे.
मार्च महिन्यामध्ये चिपळूण नगरपालिकेने शहरातील रस्त्यालगत असणाऱ्या सर्व टपऱ्या आणि खोकेधारकांच्या विरोधात कारवाई करत त्यांना हटवण्याची मोहीम राबवली. मात्र, त्यानंतर अशा रस्त्याच्याकडेला छोट्याशा व्यवसाय करणाऱ्यांना खूपच आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले आहे. अजूनही काही रस्त्यालगत आपले धंदा लावू शकत नाही. आता पावसाळा सुरू झाल्याने मुलांचे शिक्षण, शाळेची फी आणि कुटुंबाला लागणारी कौटुंबिक साधन सामुग्री जमा करताना त्यांचा जीव मेटाकुटीला येत आहे. आर्थिक विवंचना हा मोठा प्रश्न त्यांना भेडसावत आहे. यातूनही काही जण मार्ग काढत जिद्दीने रोजगार मिळण्यासाठी प्रयत्न करीत आहेत .
असाच भोगाळे परिसरात ऊन पाऊस वारा याची तमा न बाळगता काहीजण पोटासाठी रस्त्याच्या दूर माल विकत आहेत. दिवसाची रोजंदारी अशी सुटेल याचा प्रयत्न करीत आहेत. गेले काही दिवस मान्सूनपूर्व पावसाने अक्षरशः हैराण केले आहे. मात्र अशा परिस्थितीत सुध्दा भोगाळे मध्ये रस्त्यावर आपलं छोटसं साहित्य लावून ते ग्राहकांना विकण्यासाठी ते व्यवसाय करताना दिसून येतात. त्यांच्या समोर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाचा प्रश्न आहे. मुलांचे शिक्षण आहे. यासाठी तर पावसात सुद्धा दिवसभर उभे राहून व्यवसाय करीत आहेत.
नगरपालिकेने केलेली कारवाई जरी बरोबर असली तरी सुद्धा अशा टपरीधारक किंवा छोट्या व्यवसाय करणाऱ्यांना कुठेतरी शहरांमध्ये एका ठिकाणी जागा उपलब्ध करून देणे फार गरजेचे आहे. जेणेकरून त्यांच्याही पोटाचा प्रश्न सुटेल. आता पावसात अशा छोट्या टपरीधारकांनी कुटुंब कसे चालवावे हा सुध्दा प्रश्न त्यांच्या समोर आहे.












