रत्नागिरी : अवकाळी पाऊस, पूर्व मौसमी पावसापाठोपाठच अचानक मान्सून तळ कोकणात दाखल झाला असून पाऊस आता थांबायचं नाव घेत नाहीये. कालच हवामान खात्याकडून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 29 मे पर्यंत पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला होता. तर आज सोमवारी दुपारी हवामान खात्याने रत्नागिरी जिल्ह्यासाठी 27 मे पर्यंत रेड अलर्ट घोषित केला आहे. यामुळे अनेक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या सतत आणि अचानक सुरू झालेल्या मान्सूनमुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झालं असून नद्यांना पूर आला आहे. दापोली येथे एक व्यक्ती वाहून गेला आहे. दापोली खेड हा मार्ग बंद पडला आहे. महामार्गाची अवस्था अत्यंत बिकट आहे तर रविवारी रात्री चिपळूण तालुक्यातील वाशीष्टी नदीमध्ये खडपोली येथे एका महिलेसह तिघेजण नदीपात्रात अडकले होते. त्यांची सुटका करण्यात आली आहे. एकूणच सर्वत्र परिस्थिती बिघडलेली असतानाच आता हवामान विभागाकडून रत्नागिरी जिल्हा घोषित करण्यात आला असल्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
दरम्यान सोमवारी 26 मे रोजी सकाळी आठ वाजता संपलेल्या 24 तासात रत्नागिरी जिल्ह्यात 997.93 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली. तर तालुका निहाय पडलेल्या पावसामध्ये
१) मंडणगड-211.25मिमी
२) खेड-85.85 मिमी
३) दापोली- 144.28 मिमी
४) चिपळूण – 123.66मिमी
५) गुहागर-97.20मिमी
६) संगमेश्वर 101.91 मिमी
७)रत्नागिरी -93.33मिमी
८) लांजा – 81.20 मिमी
९) राजापूर 59.25 मि मि
आजचा एकूण पाऊस =997.93 मिमी
आजचा एकूण सरासरी पाऊस 110.88 मिमी.












