दापोली l प्रतिनिधी- गेली तीन वर्षे दापोली शहराचा विकास रखडला असून गृहराज्यमंत्री ना. योगेश कदम यांच्या नेतृत्वाखाली दापोली शहरात पुढील 2 वर्षात अनेक विकास कामे करावयाची असून त्यासाठी आपण सर्वांच्या सहकार्याने प्रयत्नशील राहणार असल्याचे मत दापोली नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष सौ. कृपा घाग यांनी व्यक्त केले.
दापोली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ. ममता मोरे यांच्यावरील अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर आज दि. 28 मे रोजी निवडणूक घेण्यात आली. यावेळी महायुती तर्फे शिवसेनेच्या नगरसेविका सौ. कृपा घाग यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. नगराध्यक्ष पदासाठी एकच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली व शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला व सुमारे 3वर्षापूर्वा पाहिलेले स्वप्न पूर्ण झाले, अशी प्रतिक्रिया यावेळी अनेक पदाधिकाऱ्यांनी दिली.
यावेळी पत्रकारांशी वार्तालाप करताना नगराध्यक्षा सौ. कृपा घाग म्हणाल्या की, दापोलीचा नगराध्यक्ष म्हणून मी काम करत असताना कोणताही पक्षीय भेद करणार नाही. सर्व जनतेचे काम आपण करणार असून महायुतीच्या सर्वच पक्षांनी आपल्याला पाठिंबा दिला आहे. आज नगरपंचायतीमध्ये आमचे बहुमत असले तरी सर्वांना विश्वासात घेऊन जनतेला अभिप्रेत असे काम आपण करणार आहोत. आज दापोलीकरांच्या सुदैवाने मंत्रीपद विद्यमान आमदार योगेशदादा कदम यांना मिळाले असून दापोलीच्या विकासाच्या त्यांच्या अनेक योजना आहेत. या योजना आम्ही निश्चितच पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. गेली अनेक वर्षे दापोलीची नळपाणी योजना सोडेंघर येथून आणण्यासाठी प्रयत्न होत आहेत. आमचे मार्गदर्शक कोकणचे नेते ना. रामदासभाई कदम यांनी याबाबत आम्हा सर्वांना आदेश दिले असून ही योजना पुढील काही महिन्यात पूर्णत्वास जाण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत. दापोली नगरपंचायतीला प्रशासकीय वाहन, नगराध्यक्षांसाठी वाहन, अग्निशामक बंब, रूग्णवाहिका आदी वाहनांची कमतरता आहे. ही बाब आम्ही निश्चितच पूर्ण करू.
दापोली शहर हे पर्यटन दृष्टया महत्वाचे शहर असून शहरामध्ये पर्यटक जास्त काळ थांबावेत यासाठी आपण प्रयत्न करणार असून शिवपुतळ्यानजिक गृहराज्यमंत्री ना. योगेशदादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसृष्टी उभारण्याचा आपला प्रयत्न असणार आहे. त्याचप्रमाणे शहरातील कचऱ्याचे योग्य नियोजन होण्यासाठी आपण प्रयत्न करणार असून मच्छीमार्केट लवकरच स्थलांतरित करण्याचा आपला मानस असणार आहे. दापोली शहर हे स्वच्छ व सुंदर होण्यासाठी आपण सर्व नगरसेवक व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन कामकाज करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी शिवसेनेतर्फे तालुकाप्रमुख उन्मेष राजे, प्रदीप सुर्वे, सुधीर कालेकर, रसिका पेटकर, रोहिणी दळवी, राजेंद्र पेटकर, शहरप्रमुख पप्पू रेफेकर, भगवान घाडगे यांच्यासह विविध पदाधिकारी तसेच भाजपाचे जिल्हाध्यक्ष केदार साठे, तालुकाध्यक्ष संजय सावंत, जया साळवी, संदीप केळकर, स्वरूप महाजन यांच्यासह अन्य पदाधिकारी राष्ट्रवादी तर्फे तालुका कार्याध्यक्ष मोहन मुळ्ये, शहराध्यक्ष नितीन मयेकर व अन्य पदाधिकारी, आरपीआयच्या वतीने प्रितम रूके व अन्य मान्यवर उपस्थित होते.
नगराध्यक्ष निवड झाल्यानंतर सौ. कृपा घाग यांची दापोली शहरातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी आनंद व्यक्त केला.












