मंत्री नितेश राणे व आमदार निलेश राणे यांचा पुढाकार गाबीत क्षत्रिय आरमारी आर्थिक विकास महामंडळ स्थापनेसाठी बळ देणारा

गाबीत समाज जिल्हा संघटक रविकिरण चिंतामणी तोरसकर

मालवण | प्रतिनिधी : गाबीत क्षत्रिय आरमारी आर्थिक विकास महामंडळ स्थापनेसाठी मत्स्यद्योग तथा बंदरे विकास मंत्री नितेश राणे व आमदार निलेश राणे यांचा पुढाकार महामंडळ स्थापनेसाठी बळ देणारा आहे. गाबीत समाजातर्फे मंत्री नितेश राणे व आमदार निलेश राणे यांचे गाबीत समाज जिल्हा संघटक रविकिरण चिंतामणी तोरसकर यांनी आभार व्यक्त केले आहेत.

 

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रात म्हटले आहे, महाराष्ट्र सरकारने सतरा प्रकारच्या वेगवेगळ्या समाजासाठी आर्थिक विकास महामंडळे स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. ज्यामध्ये हिंदू धर्मातील विविध समाजाचा समावेश आहे. तसेच यापूर्वी महात्मा फुले महामंडळ अण्णासाहेब पाटील, महामंडळ शामराव पेजे महामंडळ, अण्णाभाऊ साठे महामंडळ, वसंतराव नाईक महामंडळ, चर्मोद्योग महामंडळ ही महामंडळ आहेत. नाभिक समाजासाठी संत सेना महाराज आर्थिक विकास महामंडळ ही स्थापन करण्यात आलेले आहे.

हिंदू धर्मातील क्षत्रिय आरमारी म्हणून ओळखला जाणारा गाबीत समाज हा विशेषतः महाराष्ट्रातील किनारपट्टीवर वसलेला आहे. तसेच या समाजाला सन ६५९ पासूनचा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या हिंदुस्थानातील पहिल्या आरमाराच्या बांधणीत आणि स्वराज्याच्या लढाईत गाबीत समाजाचा मोठा वाटा आहे. पुढील काळात गाबीत समाज मासेमारीकडे वळला. तसेच सद्यस्थितीत मासेमारी बरोबरच पर्यटन व्यवसायामध्ये भविष्य शोधीत आहे. गाबीत समाजाची वस्ती भारतातील कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र व काही प्रमाणात गुजरात येथे आढळून येते. मासेमारी व्यतिरिक्त इतरही उद्योगधंद्यात गाबीत समाज संघर्ष करीत आहे. गाबीत समाज ओबीसी चा एक घटक असून तो विशेष मागास प्रवर्गात मोडतो. सरकारने मत्स्योद्योग विकास महामंडळे स्थापन केलेली आहे. परंतु सर्वंकष हिंदू गाबीत समाजाच्या विकासासाठी विशेष असे गाबीत समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ गरजेचे आहे. यासाठी आम्ही सरकारकडे इतर जाती जमातींच्या आर्थिक विकास महामंडळाबरोबरच, हिंदू गाबीत समाजाचे गाबीत क्षत्रिय आरमारी आर्थिक विकास महामंडळ त्वरित स्थापन करावे. अशी मागणी केली होती. गाबित समाजातील विविध संघटना याचा पाठपुरावा करीत आहेत. सदरच्या पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद देत मत्स्यद्योग तथा बंदरे विकास मंत्री नितेश राणे व आमदार निलेश राणे यांनी दिला. बहुजन कल्याण मंत्री अतुलजी सावे यांच्याकडे सदरचा विषय मांडला व त्यांनी ही महामंडळ स्थापनेसाठी सकारात्मक प्रतिसाद दिला. महायुती सरकार माध्यमातून महामंडळ स्थापन होईलच. महामंडळ स्थापनेसाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल मंत्री नितेश राणे व आमदार निलेश राणे यांचे गाबीत समाजातर्फे आभार व्यक्त करत असल्याचे गाबीत समाज जिल्हा संघटक रविकिरण चिंतामणी तोरसकर यांनी सांगितले.