खेड(प्रतिनिधी)पावसाळ्यात साथींचा प्रादुर्भाव उद्भवू नये, यासाठी तालुका आरोग्य विभागाने आतापासूनच आवश्यक त्या उपाययोजनांचा अवलंब करण्यास सुरूवात केली आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश खरटमोल यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेत अत्यावश्यक सूचना केल्या आहेत. यंदा ४ गावे साथग्रस्त यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. या गावांवर त्या-त्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी करडी नजर ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
आठवडाभरापासून पावसाने धुमाकूळ घातला होता. यामुळे साथीचे आजार फैलावण्याची शक्यता
नाकारता येत नाही. साथीच्या आजारांसह डेंग्यू, मलेरियाचा प्रादुर्भाव डोके वर काढू नये, याासठी तालुका आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. खरटमोल यांच्या मार्गदर्शनाखाली शहरासह ग्रामीण भागात त्या-त्या वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांमार्फत सर्वेक्षणाची मोहीम तातडीने हाती घेण्यात आली आहे. नागरिकांमध्येही जनजागृती करण्यावर भर दिला जात आहे. साथग्रस्त गावांमध्ये आंबवली प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत किंजळे, वावे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत मुसाड, शिव बुद्रुक प्रार्थमक आरोग्य केंद्रांतर्गत बोरज तर तिसंगी प्राथ. आरोग्य केंद्रांतर्गत जांभुळगाव आदी गावांचा समावेश आहे. या गावांवर विशेष लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचना तालुका आरोग्य विभागाकडून करण्यात आल्या आहेत.












