देवगड : प्रतिनिधी
तळेबाजार चांदोशी येथील सौ. कांचन संजय म्हापसेकर (58) यांना मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी त्यांचा मनोरुग्ण मुलगा सिध्देश संजय म्हापसेकर (३०) या संशयिताला देवगड पोलिसांनी अटक करून रविवारी देवगड न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने संशयिताला 13 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. संशयिताच्यावतीने ॲड. आशिष लोके यांनी काम पाहिले.
मनोरूग्ण मुलगा सिद्धेश याच्या सततच्या त्रासाला कंटाळून ३० मे रोजी रात्री ९ वा. च्या सुमारास त्याचे वडील संजय म्हापसेकर व त्यांची पत्नी सौ. कांचन यांनी मनोरूग्ण मुलगा सिध्देश याच्या झोपेच्या गोळ्या व झुरळ मारण्याचे औषध प्राशन केले. दुसऱ्या दिवशी 31मे रोजी सकाळी त्यांना नातेवाईकांनी जामसंडे येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. यात सौ. कांचन यांचा उपचार सुरु करण्यापूर्वीच मृत्यू झाला. तर संजय यांची प्रकृती स्थिर आहे. याप्रकरणी संजय म्हापसेकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार देवगड पोलिसांनी संशयित सिद्धेश म्हापसेकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती. घटनेचा तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक सुप्रिया बंगडे करीत आहेत.











