इन्व्हर्टरचे काम करताना वीजेच्या धक्क्याने दापोलीत मृत्यू

दापोली lप्रतिनिधी: दापोली तालुक्यात पावसाळ्याच्या दिवसात अनेक दुर्घटना घडत असतात. दापोली तालुक्यात लाडघर येथे घडली आहे. लाईट इन्व्हर्टरचे काम करत असतानाच शॉक लागल्याने ६२ वर्षीय पर्यटन व्यवसायिकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. लाडघर येथील सुखसागर हॉटेलचे मालक सुनील होलम यांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. त्यांच्या अपघाती मृत्यूने परिसरावर शोककाळा पसरली आहे.

 

लाडघर येथील औदुंबरवाडी येथे राहणारे ग्रामस्थ सुनील होलम यांचा गेली अनेक वर्ष पर्यटनाचा व्यवसाय आहे. हॉटेल सुखसागरचे ते मालक आहेत. गेले सुमारे वीस वर्षे ते हा व्यवसाय करत आहेत. होलम कुटुंबीयांचा शेती, बागायती, पर्यटन हा व्यवसाय आहे. मंगळवारी दुपारनंतर घरातच काही काम करत असताना त्यांना अचानक इन्व्हर्टरच्या विजेचा शॉक लागला. यानंतर ते अस्वस्थ झाले त्यांना तात्काळ रिक्षातून दापोली येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वाटेतच त्यांचा मृत्यू झाला होता. दापोली उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येऊन त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. सचिन होलम यांनी पर्यटनाचा व्यवसाय करून आपल्या मुलांनाही उच्च शिक्षण दिलं होतं. मुलगी ऐश्वर्या ही नुकतीच डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयातून बी.टेक झाली आहे. तर मुलगा ऐश्वर्य हा एन.के.वराडकर महाविद्यालयातून बी.कॉम झाला आहे. लाडघर येथील ज्येष्ठ पर्यटन व्यवसायिक व बागायतदार सचिन होलम हे सुस्वभावी मदतशील व्यक्तिमत्व असलेले म्हणून ओळखले जात. यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं, भाऊ, पुतण्या, पुतणी, जावई असा मोठा परिवार आहे.