गव्याच्या हल्ल्यात माडखोल येथील युवक गंभीर जखमी

सावंतवाडी : माडखोल धवडकी येथील २१ वर्षीय युवक आदित्य रवींद्र परब याच्यावर बुधवारी रात्री साडेदहा वाजता माडखोल व्ही.पी. कॉलेज परिसरात गोव्या रेड्याने हल्ला केल्याने तो गंभीर जखमी झाला. या हल्ल्यात आदित्यच्या उजव्या पायाच्या मांडीचे हाड मोडले असून, त्याला अधिक उपचारासाठी गोवा बांबोळी येथे हलवण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आदित्य हा कोलगाव येथील आयटीआयमध्ये शिक्षण घेत असून, बुधवारी रात्री अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण आटपून तो सावंतवाडीहून माडखोल धवडकी येथील आपल्या घरी दुचाकीने जात होता. साधारण साडेदहा वाजण्याच्या सुमारास व्ही.पी. कॉलेज परिसरामध्ये रस्त्याच्या कडेने अचानक आलेल्या गव्या रेड्याची धडक त्याच्या दुचाकीला बसली. यानंतर बिथरलेल्या गव्याने थेट आदित्यवर हल्ला करत त्याला शिंगाने उचलून फेकले.

या हल्ल्यात आदित्यच्या उजव्या पायाच्या मांडीचे हाड मोडले असून, त्याचा मोबाईल आणि दुचाकीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घटनेनंतर गावातील काही तरुणांनी त्याला तात्काळ सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

मात्र,आदित्यच्या घरची परिस्थिती बेताची असल्याने उपजिल्हा रुग्णालयात खाजगी रुग्णालयात उपचार न करता त्याला अधिक उपचारासाठी गोवा बांबोळी येथे हलवण्यात आले. उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करताना सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव यांच्यासह लक्ष्मण कदम यांनी आवश्यक ती मदत केली. घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी वनविभागाचे वनक्षेत्रपाल सुहास पाटील यांनी रुग्णालयात धाव घेत जखमीची विचारपूस केली.

या घटनेबाबत वनक्षेत्रपाल सुहास पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की, “घटनास्थळाचा पंचनामा कर्मचाऱ्यांमार्फत करण्यात आला असून, सदरचा हल्ला गव्यानेच केल्याचे स्पष्ट झाले आहे, कारण त्या परिसरामध्ये गव्यांचा वावर आहे.” तालुक्यात बऱ्याच ठिकाणी रस्त्यांवरुन गव्यांचा असलेला वावर लक्षात घेता त्या ठिकाणी सूचनाफलक लावण्याबरोबरच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून स्पीडब्रेकर बसवण्याबाबत प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, गव्यांच्या वाढत्या वावरामुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. वनविभागाने यावर तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.