सर्व्हिस रोड, गटार दुरावस्था प्रश्न सोडवा; पॉवर हाऊस येथे गतिरोधक बसवा
चिपळूण (प्रतिनिधी):-गेल्या काही वर्षांपूर्वी मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, चिपळूण शहरात काम पूर्ण होतांना दिसत नाही. तर दुसरीकडे सर्व्हिस रोड व गटार व्यवस्थित नसल्याने सांडपाणी निचऱ्याचा प्रश्न निर्माण होत आहे. तसेच पॉवर हाऊस येथील गतिरोधक अजूनही टाकण्यात आलेले नाहीत. या सर्व प्रश्नांसाठी भाजपच्या शिष्टमंडळाने राष्ट्रीय महामार्ग उपविभागाच्या कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला. येत्या चार दिवसांत प्रश्न न सुटल्यास रस्त्यावर उतरू, असा इशारा दिला आहे.
चिपळूण येथील भाजपच्या शिष्टमंडळाने बुधवारी चिपळूण – बहादूरशेखनाका राधाकृष्ण व खेंड येथील चोऱ्या प्रकरणाचा पर्दाफाश लवकरच व्हावा, अशी मागणी निवेदनाद्वारे पोलिसांकडे केली. तर गुरुवारी राष्ट्रीय महामार्ग उपविभागाच्या कार्यालयावर धडक देत सर्व्हिस रोड दुरावस्था, राधाकृष्ण नगर, बौद्धवाडी, शिवाजीनगर, ओझरवाडी येथे पाऊस पडला की, रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल होतो पर्यायाने वाहनचालकांना त्रास सहन करावा लागतो. तसेच आ. निलेश राणे यांनी सुमारे दोन महिन्यांपूर्वी राष्ट्रीय महामार्ग उपविभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत घेतलेल्या बैठकीत शहरात सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामासंदर्भात चर्चा करतांना पॉवर हाऊस येथे गतिरोधक बसवण्यात सांगितले ते यानुसार राष्ट्रीय महामार्ग उपविभागीय कार्यालयाचे अधिकारी मुल्ला व खुणेकर यांनी सकारात्मकता दर्शवली होती. मात्र, अजूनही प्रतिरोधक बसवण्यात आलेले नसल्याचा मुद्दा भाजपच्या शिष्टमंडळाने अधिकाऱ्यांना विचारत कडक शब्दात जाब विचारला.
यावेळी भाजप चिपळूण शहर माजी मंडळ अध्यक्ष श्रीराम शिंदे, माजी नगरसेवक परिमल भोसले, विवेक गोखले, भाजपा कामगार मोर्चा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष विनोद कदम, भाजप शहर उपाध्यक्ष महेश कांबळी, निखिल रतावा, संदेश भालेकर, प्रफुल पिसे, सुधीर पानकर, अनिकेत वायकुळ , सुभाष करवटे आदी उपस्थित होते.












