प्रेम विवाहानंतरही मागितला १० लाखांचा हुंडा; गर्भवती पत्नीचा अमानुष छळ, पतीवर गुन्हा दाखल

प्रतिनिधी/ रोहन कांबळे

कोल्हापुर : वरणगे पाडळी येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रेमविवाहानंतर सहा महिन्यांत १० लाखांच्या हुंड्याची मागणी करून गर्भवती पत्नीचा शारीरिक आणि मानसिक छळ झाला. याबाबत पीडित महिलेने आज करवीर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी रोहित अर्जुन दुधाणे (रा. मधली गल्ली, वरणगे पाडळी) याच्यावर गुन्हा दाखल केला.पिंपरी चिंचवड येथील वैष्णवी हागवणे प्रकरण ताजे असतानाच असाच प्रकार कोल्हापूर मधे घडल्याने कोल्हापुरात एकच खळबळ उडाली आहे.

करवीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नर्सिंगचे शिक्षण घेताना पीडित तरुणीची रोहित दुधाणे याच्यासोबत ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात होऊन मे २०२४ मध्ये दोघांचे लग्न झाले. ऑक्टोबर २०२४ मध्ये पत्नीची गर्भधारणा झाल्यापासून रोहितने तिचा छळ सुरू केला. ‘मला सध्या मूल नको आहे. तू गर्भपात कर. माझ्यासोबत राहू नको. माहेरी निघून जा. लग्नात तुझ्या आई-वडिलांनी काही दिले नाही. इथे राहायचे असेल तर १० लाखांचा हुंडा घेऊन ये,’ असे म्हणत तो त्रास देत होता. पोटावर लाथा मारून ठार मारण्याची धमकीही त्याने दिली होती.

वारंवार होणा-या त्रासाला कंटाळून अखेर पीडितेने करवीर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. रोहित दुधाणे याचा शोध सुरू असून, त्याच्यावर पुढील कायदेशीर कारवाई करणार असल्याचे करवीर पोलिस ठाण्याचे निरीक्षक किशोर शिंदे यांनी सांगितले.