मत्स्यबीज केंद्रांपासून वाशिष्ठीच्या गाळमुक्तीपर्यंत; आमदार शेखर निकम यांचा विकासकामांसाठी पाठपुरावा!

मत्स्यव्यवसाय मंत्री ना. नितेश राणे यांच्या बैठकीत तीन महत्त्वपूर्ण विषय मांडले
करंबवणेच्या शासकीय जमिनीची पाहणी, पिंपळी खुर्द जागा हस्तांतरण आणि वाशिष्ठी नदीतील गाळ उपशाबाबत सकारात्मक निर्देश
चिपळूण (प्रतिनिधी) : चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघातील मत्स्यव्यवसायाला चालना देणे, स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे आणि चिपळूण शहराचा पूरधोका कमी करणे, या उद्देशाने आमदार शेखर निकम यांनी मत्स्यव्यवसाय मंत्री ना. नितेश राणे यांच्या बैठकीत तीन महत्त्वपूर्ण विषयांचा पाठपुरावा केला. मौजे करंबवणे येथील शासकीय जमिनीवर मत्स्यबीज केंद्र उभारणे, मौजे पिंपळी खुर्द येथील जागा मत्स्यव्यवसाय विभागाकडे हस्तांतरित करणे आणि वाशिष्ठी नदीतील टप्पा-३ अंतर्गत गाळ उपशाचे काम मार्गी लावणे, या विषयांवर बैठकीत सविस्तर चर्चा झाली. ना. राणे यांनी तिन्ही विषयांवर सकारात्मक व आश्वासक प्रतिसाद दिला.

*करंबवणे येथे मत्स्यबीज केंद्रासाठी संपूर्ण शासकीय जमिनीची पाहणी करण्याचे निर्देश*

करंबवणे , ता. चिपळूण येथील हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड कंपनीच्या नावे असलेली जमीन महसूल थकबाकीच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नावे करण्यात आली आहे. गाव नमुना ८-अ, खाते क्र. १४७९ नुसार या जमिनीचे एकूण क्षेत्र १३.८९८० हेक्टर (सुमारे ३४.३ एकर) आहे. यापूर्वी मत्स्यबीज केंद्रासाठी केवळ दोन हेक्टर क्षेत्र उपलब्ध असल्याची प्राथमिक माहिती विचारात घेण्यात आली होती.

ही बाब लक्षात आणून देत
आमदार निकम यांनी संपूर्ण शासकीय क्षेत्राचा विचार करून जागेची फेरतपासणी करण्याची मागणी केली. वाशिष्ठी नदीपासून जवळ असलेल्या या जागेवर पाण्याची उपलब्धता व तांत्रिक व्यवहार्यता तपासून मत्स्यबीज केंद्र अथवा अन्य रोजगारपूरक मत्स्यव्यवसाय प्रकल्प उभारण्याची शक्यता त्यांनी मांडली.

यावर मंत्री नितेश राणे यांनी संपूर्ण जमिनीची पाहणी करण्याचे निर्देश दिले.

*पिंपळी खुर्द येथील जागा हस्तांतरणाबाबत सकारात्मक निर्देश*

पिंपळी खुर्द, ता. चिपळूण येथील गट क्र. २१ मधील महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या अखत्यारीतील सुमारे १० हेक्टर (२५ एकर) जागेवर मत्स्यबीज केंद्र उभारण्याचा प्रस्ताव आमदार शेखर निकम यांनी बैठकीत मांडला.

या जागेवर वीजपुरवठा, बारमाही पाण्याची उपलब्धता आणि जोडरस्ता यांसारख्या सुविधा आहेत. तसेच, मत्स्य महाविद्यालय, शिरगाव येथे करण्यात आलेल्या पाणी परीक्षणात पाणी मत्स्यबीज उत्पादनासाठी योग्य असल्याचे नमूद करण्यात आले आहे. संबंधित विभागांच्या संयुक्त स्थळपाहणीतही ही जागा योग्य असल्याचे प्राथमिक निष्कर्ष समोर आले आहेत.

मात्र, ही जागा महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या अखत्यारीत असल्याने तिचे मत्स्यव्यवसाय विभागाकडे हस्तांतरण होणे आवश्यक आहे. यासाठी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी समन्वय साधून आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी आमदार निकम यांनी केली.

मत्स्यव्यवसाय मंत्री ना. नितेश राणे यांनी ही जागा मत्स्यबीज केंद्रासाठी योग्य असल्याचे मान्य करत जागा हस्तांतरणाच्या दृष्टीने सकारात्मक निर्देश दिले.

*वाशिष्ठी नदीच्या टप्पा-३ गाळ उपशासाठी ड्रेझर व निधीचा मुद्दा*

जुलै २०२१ च्या महापुरानंतर चिपळूण शहर आणि परिसरातील गावांचा पूरधोका कमी करण्यासाठी वाशिष्ठी नदीतील गाळ उपशाचा विषय महत्त्वाचा ठरला आहे. गोवळकोट ते बहिरवली या टप्पा-३ मध्ये सुमारे ४२.७८ लक्ष घनमीटर गाळ उपसण्याचे नियोजन असून, या कामाला गती मिळणे आवश्यक आहे.

आमदार निकम यांनी या कामाची जबाबदारी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डामार्फत निश्चित करण्याचा मुद्दा मांडला. त्यासाठी जिल्हाधिकारी यांनी संबंधित बोर्डाकडे प्रस्ताव सादर करून आवश्यक सर्वेक्षण, परवानग्या आणि निधीची प्रक्रिया पुढे न्यावी, यावर भर देण्यात आला.

तसेच, वाळू उपसा आणि गाळ उपसा यांतील फरक लक्षात घेऊन नदीतील गाळ काढण्याच्या कामावर लक्ष केंद्रित करावे, अशी भूमिका मांडण्यात आली. प्रत्यक्ष कामासाठी आवश्यक ड्रेझर खरेदी करण्याबाबत आपत्ती व्यवस्थापन निधीसह उपलब्ध आर्थिक पर्याय तपासून कार्यवाही करण्याचाही मुद्दा बैठकीत उपस्थित करण्यात आला.

चिपळूण शहराचा भविष्यातील पूरधोका कमी करण्यासाठी आवश्यक निधी, यंत्रसामग्री आणि परवानग्यांचा समन्वय साधून टप्पा-३ मधील गाळ उपशाचे काम प्राधान्याने व कालबद्ध पद्धतीने मार्गी लावण्याची आवश्यकता आमदार निकम यांनी अधोरेखित केली. या विषयावरही मंत्री महोदयांनी समाधानकारक व आश्वासक प्रतिसाद दिला.

*मत्स्यव्यवसायाचा विकास आणि जनसुरक्षेला प्राधान्य*

करंबवणे आणि पिंपळी खुर्द येथील मत्स्यबीज केंद्रांच्या माध्यमातून स्थानिक मच्छीमारांना दर्जेदार मत्स्यबीज उपलब्ध होण्यास, मत्स्यपालनाला चालना मिळण्यास आणि युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होण्यास मदत होऊ शकते. दुसरीकडे, वाशिष्ठी नदीतील गाळ उपशामुळे चिपळूण शहरासह परिसरातील गावांचा पूरधोका कमी करण्याच्या प्रयत्नांना बळ मिळू शकते.

स्थानिक संसाधनांचा लोकहितासाठी उपयोग, मत्स्यव्यवसायातून रोजगारनिर्मिती आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना, या तिन्ही बाबींना प्राधान्य देत आमदार शेखर निकम यांनी बैठकीत विषयांचा पाठपुरावा केला. मत्स्यव्यवसाय मंत्री ना. नितेश राणे यांच्या सकारात्मक प्रतिसादानंतर आता संबंधित विभागांच्या समन्वयातून या प्रस्तावांवर प्रत्यक्ष कार्यवाही होणे महत्त्वाचे ठरणार आहे.