कळंबस्ते येथे पशुसंवर्धनच्या साडेतीन एकर पडीक जागेत देवराई

जागतिक पर्यावरण दिनी १ हजार २५२ वृक्षारोपण

प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्यासह महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केले श्रमदान

चिपळूण (प्रतिनिधी)–. ः जागतिक पर्यावरण दिनाचे औचीत्य साधून तालुक्यातील कळबंस्ते येथील पशुसंवर्धन विभागाच्या साडेतिन एकर पडीक जागेत देवराई उभारण्यासाठी सामुहिक श्रमदानातून वृक्षारोपण करण्यात आले. येथे एकाच दिवसात १४९ विविध प्रजातीची १२५२ झाडे लावण्यात आली. सकाळी सात वाजल्यापासून उन आणि पावसात प्रांताधिकारी, तहसीलदार, यांच्यासह महसूल, कृषी विभाग आदी २०० हून अधिक शासकीय अधिकारी व कर्मचारी व नागरिकांनी देवराईच्या वृक्षलागवडीसाठी श्रमदान केले.

 

कळबंस्ते येथे उभारण्यात येत असलेल्या देवराईच्या वृक्ष लागवडीसाठी सकाळी सातच्या सुमारास महसूल, कृषी, सह्याद्री निसर्ग मित्र चे स्वयंसेवक व नागरिक जमले. वृक्षलागवडीसाठी येथे नियोजनबद्ध आराखडा प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केला होता.

 

लागवडीपुर्वी येथे चर खोदून ठिंबक सिंचनची व्यवस्था केली होती. तर झाडांना नियमीत पाणी मिळण्यासाठी बोअरवेलची देखील व्यवस्था केली आहे. त्यानुसार एका विभागात एकाच जातीच्या रोपांची लागवड करण्यात आली. वृक्ष लागवडीसाठी फावडे, कुदळ, जेसीबी आदी यंत्र सामुग्रीची चोख व्यवस्था होती. सकाळी सात वाजता सुरू झालेले वृक्षारोपण सायंकाळ पर्यंत भर उन आणि पावसात सुरूच होते.

 

प्रांताधिकारी आकाश लिगाडे, तहसीलदार प्रविण लोकरे, तालुका कृषी अधिकारी शत्रुघ्न म्हेत्रे, उपविभागीय कृषी अधिकारी शिवाजी शिंदे, सर्व नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी यांच्यासह तालुक्यातील सर्व तलाठी, कोतवाल, कृषी सहायक, गुहागर तालुक्यातील महसूलचे अधिकाऱ्यांचा चमू वृक्षारोपणासाठी श्रमदान करीत होते.

 

हा संपुर्ण प्रकल्प लोकसहभागातून राबविण्यात येत आहे. याकामी प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी महत्वपुर्ण योगदान दिले आहे.

 

आमदार शेखर निकम यांनी या देवराईच्या वृक्षारोपण कार्यक्रमास भेट देत लोकसहभागातून राबवलेल्या या उपक्रमाचे तोंड भरून कौतूक केले. हा प्रकल्प तालुक्यासाठी आदर्शवत ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी आमदारांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

 

येथे मोकाट गुरांपासून झाडांना सरंक्षण मिळण्यासाठी तारेचे कंपाऊड घातले आहे. सुमारे दिडशे देशी प्रजातीची १२५२ झाडे येथे लावली आहेत. दोन झाडांमध्ये सुमारे १५ ते २० फुटाचे अंतर ठेवून नियोजनबद्ध लागवड केली. पुढील कालावधीत झाडांची माहिती देणारे फलक व अधिक माहितीसाठी त्याचा क्युआर कोड दोन्ही झाडांच्या मध्यभागीच लावण्यात येणार आहे. जेणेकरून मुलांना विविध प्रकारच्या झाडांची माहिती मिळू शकेल. या प्रकल्पाची निगा राखणे, त्यांचे संगोपन करणे आदी विविध बाबींची जबाबदारी सह्याद्री निसर्ग मित्र या संस्थेवर सोपवली आहे.