आर. सी. काळे माध्यमिक विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनात केले प्रतिपादन
चिपळूण (प्रतिनिधी) : विद्यार्थी घडवण्यामध्ये कुटुंब, शाळा आणि समाज यांचा मोलाचा वाटा असतो. त्यातही मुलांवर योग्य ते संस्कार आणि वळण लागण्यामध्ये पालकांची खूप मोठी जबाबदारी आहे. ती जबाबदारी आपण योग्य निभावल्यास योग्य विद्यार्थी तथा पाल्य निर्माण होतो, असे प्रतिपादन रत्नागिरीच्या विभागीय वनाधिकारी श्रीमती गिरीजा देसाई यांनी येथे केले. तालुक्यातील पेढे परशुराम येथील भगवान परशुराम पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या आर. सी. काळे माध्यमिक विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम- कलाविष्कार २०२५ नुकताच विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्या उद्घाटनपर कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. अभय सहस्रबुद्धे होते. यावेळी विचारमंचावर मुख्याध्यापक विनायक माळी, पर्यवेक्षक सौ. विशाखा माळी यांच्यासह संस्थेचे सरचिटणीस सुनील गमरे, उपाध्यक्ष गोपीनाथ रेपाळ, माध्यमिक शालेय समितीचे चेअरमन दिलीप माळी, संस्थेचे सल्लागार मधुकर मोरे, जनार्दन मालवणकर, अंतर्गत हिशेब तपासणीस नामदेव मोरे, तज्ञ संचालक मोहन शिंदे, परशुराम गावच्या सरपंच सौ. गायत्री जोगले, धामणदेवी गावच्या सरपंच सौ. संजीवनी नरळकर, एसटीचे विभागीय नियंत्रक श्री. बोरसे, श्री. कुलकर्णी, चिपळूण आगाराचे आगार व्यवस्थापक दीपक चव्हाण, क्रीडा कुलचे तालुका समन्वयक तुषार कदम, प्राथमिक मुख्याध्यापिका सौ. नूतन शिंदे, शिशुवाटिकेच्या मुख्याध्यापिका सौ. प्रज्ञा मेस्त्री, कनिष्ठ महाविद्यालयाच्या समन्वयक सुधा यादव, माध्यमिक समन्वयक नितीन रेपाळ, प्राथमिक समन्वयक श्रीमती उज्वला दौंडे, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष सौ.अस्मि सकपाळ, सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ दीप्ती सुर्वे, शिक्षक प्रतिनिधी सुधीर सावर्डेकर, शिक्षकेतर प्रतिनिधी संदीप थत्ते, विद्यार्थी प्रतिनिधी विघ्नेश खापरे, विद्यार्थिनी प्रतिनिधी रश्मी जाडे, संस्थेचे संस्थापक सदस्य डी एस मोहिते आदी उपस्थित होते. श्रीमती देसाई पुढे म्हणाल्या, पेढे परशुराम सारख्या ग्रामीण भागात ही शाळा असूनही चांगल्या प्रकारे शाळेची वाटचाल सुरू आहे. अशाच प्रकारे नवनवीन उपक्रम सुरू करून शाळेला प्रगतीच्या उत्तुंग शिखरावर नेता येईल. त्यासाठी आपण प्रयत्न सुरू ठेवावेत. शाळेतील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा व तत्संबंधी आवश्यक मार्गदर्शन करण्यासाठी मी नेहमीच सहकार्य करेन. विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभल्यास त्यांचा पुढचा मार्ग सुकर होईल. त्या दृष्टीने संस्थेने प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करण्यात आले. नंतर विद्यार्थ्यांनी ईशस्तवन व स्वागत गीत सादर केले. यावेळी शाळेच्या वतीने पर्यवेक्षक विशाखा माळी व संस्थेचे अध्यक्ष डॉ. अभय सहस्रबुद्धे यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्या श्रीमती गिरीजा देसाई यांचा सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक मुख्याध्यापक विनायक माळी यांनी केले. त्यामध्ये त्यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा घेतला. शाळेसमोरील सर्व आव्हानांचा मुकाबला करून पुढे वाटचाल करण्याचा मनोदय व्यक्त केला. तदनंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते पार पडला. कला, क्रीडा, संस्कृती, शिक्षण अशा विविधअंगी क्षेत्रात उत्तुंग यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. वर्ष २०२५-२६ मधील आदर्श विद्यार्थी सार्थक महाडिक व विद्यार्थिनी मुक्ता बापट यांचा विशेष सत्कार मुख्याध्यापकांच्या हस्ते करण्यात आला. अध्यक्ष भाषणात डॉ. अभय सहस्त्रबुद्धे यांनी आपली शिक्षण संस्था या पुढच्या काळात अधिक जोमाने काम करेल, असा विश्वास व्यक्त करून संस्थेला लवकरच ५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने विविधांगी उपक्रम हाती घेण्याचा मनोदय व्यक्त केला. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदेश पवार यांनी केले. उद्घाटनाचा कार्यक्रम झाल्यावर कलाविष्कार २०२५ या सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण मोठ्या उत्साहात करण्यात आले. वेगवेगळ्या विषयांवरील मांडणी विविध कार्यक्रमातून करण्यात आली. या कार्यक्रमाचा रसिकांनी उस्फूर्त अनुभव घेतला. या कार्यक्रमाला पेढे परशुराम पंचक्रोशीतील विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.












