मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक १० तासापेक्षा जास्त होती ठप्प

रत्नागिरी ः प्रतिनिधी : मुंबई-गोवा महामार्गावरील निवळी येथील अपघातामुळे वाहतूक गेल्या 10 तासांपासून ठप्प होती. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अपघातानंतर पलटी झालेल्या टँकरमधून मोठ्या प्रमाणामध्ये गॅस गळती सुरू झाल्याने खबरदारी म्हणून गोव्यावरून येणारी वाहतूक पाली आणि उक्षी मार्गे वळवली तर मुंबईहुन गोव्याकडे जाणारी वाहतूक संगमेश्वरमार्गे वळवली होती.

संध्याकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान कंटेनरमधे 2 मेट्रिक टन बर्फाच्या स्वरूपात एलपीजी (LPG) होता, तो बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू होती.

मुंबई-गोवा महामार्गावरील निवळी येथे रविवारी सकाळी 8 वा. रत्नागिरी येथे शिक्षकांच्या वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणासाठी जात असलेल्या शिक्षकांच्या मिनीबसला अपघात झाला. या अपघातात 28 शिक्षकांसह इतर मिळून एकूण 31जण जखमी झाले.
रविवारी सकाळी एलपीजी गॅस घेऊन टँकर (एनएलओ 1 -एन 4628) हा जयगड येथून मुंबईकडे चालला होता. तो निवळी येथील बावनदीच्या अलीकडील उतारावर आला असता चालकाचे टँकरवरील नियंत्रण सुटले. त्याचवेळी तो समोरून येणार्‍या मिनीबसवर (एमएच 02- आर आर 9609) आदळला. ही बस चिपळूणहून रत्नागिरीला चालली होती. यामध्ये सर्व शिक्षक होते. ते रत्नागिरीला प्रशिक्षणासाठी चालले होते. अपघात एवढा भीषण होता की, बस 25 – 30 फूट खोल दरीत जाऊन उलटली.
मिनीबसमधील शिक्षक जखमी झाले. त्यातील दोन गंभीर जखमी असून जखमींवर जिल्हा शासकीय रुग्णालय व खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
या अपघातात मालिनी दीपक चव्हाण (40 रा. धारतळे, रत्नागिरी ), निता विनायक शिरकर (38, रा. चिपळूण) या गंभिर जखमी आहेत तर अमोल कोतवाल, बसचालक संकेत कृष्णकांत जागुष्टे (28), धर्मेंद्र देरूगडे (53), दिलीप डोंगरे (53),कमल महाडिक, विराज सावंत (रा.47, सावर्डे, चिपळूण), निशीकांत वानरकर (51), सुलक्षणा पाटील (40), मंदा खाडे (53, रा. सावर्डे चिपळूण), स्मिता पाटील (48), जयश्री गावडे (53 रा. सावर्डे चिपळुण), मिना घागडे(52), नेहा मेस्त्री (47), मनीषा कांबळे( 47, रा. खेर्डी चिपळुण), प्रियंका जाधव(38 वर्षे रा. सावर्डे, चिपळूण), रुपाली भूवड,उषा खुडे (38, रा. खेर्डी चिपळूण), निता बांद्र े(38), हर्षाली पाकळे (26), गणेश सावर्डेकर,सचिन पोकळे, अरविंद सकपाळ, उदय खताते(55, रा. चिपळुण), श्रेयस विचारे, प्रेमकुमार शिवगण, सुरेंद्र सावंत, श्वेता चव्हाण (48, रा. चिपळुण), राजेश यादव (47, रा. सावर्डे, चिपळूण), अनंत बारकू गमरे( 65, रा. चिपळुण) हे जखमी झाले.
या अपघातामुळे मुंबई गोवा राष्ट्रीय वरील वाहतुक पाली व संगमेश्वर येथून वळवण्यात आली होती. अपघात होताच एलपीजी टँकरमधून गॅस गळती सुरु झाल्याने या गॅस गळतीमुळे बावनदी पुलाजवळील काही घरांना आग लगाली. तसेच काही गाड्या जळाल्या आणि गुरे होरपळली. अपघातानंतर आजूबाजूच्या परिसरात असणारी आंब्याची कलम देखील जळाली. गॅस गळती झाल्याने घटनास्थळी तज्ज्ञांची टीम दाखल झाली होती. पलटी झालेल्या टँकरमधून गॅस काढून वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरु होते. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधिक्षक नितीन बगाटे,ग्रामीणचे पोलिस निरीक्षक राजेंद्र यादव,उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश माईनकर,पोलिस निरीक्षक नितीन ढेरे यांनी आपल्या टिमसह घटनास्थळी भेट दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गॅस टँकर बाहेर काढण्याचे काम सायंकाळी उशिरापर्यंत युध्दपातळीवर सुरु होते.