स्वच्छता दूताला कोणी टांगलं झाडाला?
दापोली l प्रतिनिधी:- दापोली तालुक्यातील मुरुड समुद्रकिनारी एका कासवाला झाडाला टांगून ठेवल्याची गंभीर घटना उघड झाली आहे. दापोली तालुक्यात एक महिन्यापूर्वी टेटवली गावात एक मगर अर्धवट जळलेल्या परिस्थितीत आढळून आली होती .मात्र या गंभीर घटनेचा अजूनही शोध लागला नसतानाच व पर्यटनाच्या नकाशावर अग्रकमाने असलेल्या मुरुड किनाऱ्यावर कासवाला झाडाला टांगून ठेवल्याची अतिशय वेदनादायी आणि संतापजनक घटना उघड झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दापोली तालुक्यातील मुरुड समुद्रकिनाऱ्यावर एका झाडाला पूर्ण वाढ झालेले मोठे (नर )कासव एका टांगून ठेवलेल्या स्थितीत २६ मे रोजी आढळून आले. दापोली कांदळवन विभागाकडून आणि पशुवैद्यकीय विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार हे कासव २६ मे पूर्वी सुमारे पंधरा दिवस मृत झाले असावे ;आणि कोणीतरी अज्ञाताने त्याला झाडाला टांगून ठेवले असावे कारण त्याच्या शरीरातील सर्व मावसलं भाग हा निघून गेला होता .फक्त पाठीचा कडक भाग हा शिल्लक राहिलेला पंचनामा वेळी दिसून आला .या प्रसंगाची नोंद दप्तरी करण्यात आली असून गुन्हा नोंदवण्यात आला आहे .मात्र सदर कासव मृतावस्थेत झाल्यानंतर कोणीतरी टांगून ठेवले असावे असाच निष्कर्ष कांदळवन विभागाने काढला आहे अशी माहिती संबंधित विभागाकडून देण्यात आली आहे.
कासव मृतावस्थेत आढळले असताना त्याला झाडाला टांगून कोणी आणि का ठेवले हा प्रश्न मात्र गंभीर आणि अनुत्तरीत राहिला आहे. कोणती विकृत मनोवृत्ती दापोली तालुक्यातील नागरिकांच्या मनामध्ये बळावत आहे असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होत आहे. कारण कोणताही प्राणी मृताअवस्थेत कुठेही आढळून आला तर प्रथमतः वनविभागाला माहिती दिली जाते आणि काही प्रमाणात एखादा पक्षी मृता अवस्थेत दुर्दैवाने आढळून आला तर त्याला जमिनीत पुरून टाकण्याची रीत पद्धत प्रचलित आहे. मात्र या कासवाबाबत असे न होता त्याला झाडाला टांगून ठेवल्यामुळे अनेक प्रश्न समोर येत आहेत. पर्यावरण संतुलनामध्ये वन्यजीवांचा, समुद्रिकासवांचा, मगरींचा, जलचर प्राण्यांचा मोठा वाटा असतानाच दापोली तालुक्यात माशांच्या उलटीची होणारी तस्करी ,खवल्या मांजराची होणारी तस्करी, बिबट्यांच्या जीवावर बेतल्याच्या घटना, कृरपणे मगरीला जाळून मारल्याची घटना आणि आता कासवाला झाडाला टांगून ठेवल्याची घटना समोर आल्यामुळे पर्यावरण प्रेमी कासव ,प्रेमी यांच्यामध्ये संतापाची लाट उसळली आहे.
वन्य प्राण्यांच्या जीवावर सातत्याने आघात होत असताना याच्यावर कोणतीही ठोस उपाययोजना झालेली दिसून येत नाही. बेकायदेशीर वृक्ष तोड, वन्य प्राणी हत्या कायदा कडक असून त्याबाबतची जनजागृती , आणि कडक अंमलबजावणी होणे अत्यावश्यक बाब आहे. तसेच वन्य प्राण्यांचा निसर्गातील साखळीमध्ये असलेला महत्त्वाचा सहभाग याबाबतची जाणीव जागृती प्रकर्षाने संबंधित विभागाने करणे अत्यावश्यक गोष्ट आहे. असे मत पर्यावरण अभ्यासक डाँ. प्रशांत परांजपे यांनी या घटनेनंतर माध्यमांशी बोलताना व्यक्त केले आहे.
पर्यावरण संतुलनातील वन्यजीव हा एक मोठा भाग असतानाच दापोली तालुक्यासारख्या मिनी महाबळेश्वर म्हणून गणल्या जाणाऱ्या तालुक्यात अशा गंभीर घटना वारंवार घडत असल्यामुळे भविष्यात जैवविविधता नष्ट होऊन हे सर्व प्राणी आणि झाडे ही वस्तुसंग्रहालयातच पाहायला मिळण्यापूर्तीच शिल्लक राहतील अशी उद्विग्न प्रतिक्रिया या निमित्ताने पर्यावरण प्रेमींनी व्यक्त केली आहे.












