राजापूर (वार्ताहर): प्राचीन मंदीरांच्या जतन-संवर्धन आणि परिसर विकास कार्याक्रमांर्तंगत राजापूरचे आराध्यदैवत श्री देव धुतपापेश्वरचे प्राचीन मंदीर आणि परिसराचे जतन, संवर्धन आणि सुशोभिकरण करण्यात आले आहे. सद्यस्थितीमध्ये बांधकाम आणि सुशोभिकरणाचे बहुतांश काम पूर्ण झाले असून त्यातून, या प्राचीन मंदीराला नवा सुशोभिकरणाचा साज चढला आहे. त्यामुळे वैशिष्ट्यपूर्ण आणि विलोभनीय परिसर लाभलेल्या या मंदीराचे अनोखे सौंदर्य अधिक खुलून गेले आहे. त्यामुळे भाविकांसह पर्यटकांची पावले या परिसराकडे वळू लागली आहेत.

शहरानजिकच्या धोपेश्वर येथे श्री धुतपापेश्वरचे मंदीर मृडानी नदीच्या काठावर बांधण्यात आलेले आहे. मंदीराचे वैशिट्यपूर्ण बांधकाम आणि मंदीराच्या गाभाऱ्यातील लाकडी बांधकामासह या ठिकाणचे उभे खांबांवरील कोरीव काम त्या काळातील स्थापत्यशास्त्राची प्रचिती देते. मंदीराच्या पाठीमागून वाहणाऱ्या मृडानी नदीवर उंचावरून पांढऱ्या शुभ्र धारांनी कोसळणारा धबधबा या मंदीराच्या परिसराचे निसर्ग सौंदर्य अधिक खुलवून टाकतो. त्याचवेळी उंचावरून कोसळणाऱ्या धबधब्याच्या पाण्याचा होणारा अनोखा गाज या ठिकाणी याणारे भाविक आणि पर्यटकांचे मन धुंद करून टाकतो.
मंदीर आणि परिसरातील धार्मिक आणि पर्यटनाचा अनोखा संगम अनुभवण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागातून मोठ्यासंख्येने भाविक दरवर्षी या ठिकाणी येतात. त्यामुळे मंदीर आणि परिसराचे जतन अन् संवर्धन होताना त्याचे सुशोभिकरण व्हावे अशी मागणी राजापूरवासियांकडून केली जात होती. त्याप्रमाणे प्राचीन मंदिरांचा जतन- संवर्धन आणि परिसर विकास कार्यक्रम राज्यशासनातर्फे या मंदीराचे जतन अन् संवर्धन करताना सुशोभिकरणाचे काम हाती घेण्यात आले.
श्री धुतपापेश्वर मंदीराच्या सुशोभिकरणाचे काम एमएसआरडीसी’च्या माध्यमातून हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी सुमारे ११ कोटी रूपयांचा आराखडा तयार करण्यात आला होता. या आराखड्याप्रमाणे मंदिराचा जीर्णोध्दार वा पुर्नबांधकाम करणे, मंदिर परिसरातील पर्यटनाच्या भाविकांच्या दृष्टीने सोयीसुविधा निर्माण करणे व इतर सोयी सुविधा संलग्न कामे करणे अशा तीन टप्प्यामध्ये मंदीराचे जतन अन् संवर्धनाच्या कामांसह परिसर सुशोभिकरणाची कामे करण्यात आली आहेत.
सद्यस्थितीमध्ये मंदिर जतन, संवर्धन आणि सुशोभिकरणाचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे. मंदीराचे आकर्षक अन् वैशिष्ट्यपूर्ण प्रवेशद्वार, प्रशस्त सभामंडप, तेथील लाकडी बांधकामासह लाकडी खांबावर करण्यात आलेले नक्षीदार कोरीव काम, मंदिर परिसरात करण्यात आलेली आकर्षक विद्युत रोषणाई, भाविकांसाठी बैठक व्यवस्था या ठिकाणी येणारे भाविकांसह पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात. त्याचवेळी गेल्या काही दिवसांपासून पूर्णक्षमतेने कोसळणारा मृडानी नदीवरील धबधबा आणि मंदीराच्या बाजूनी हिरवाईने नटलेला डोंगर मंदीर आणि परिसराचे निसर्गसौंदर्य अधिकच खुलून जाते.












