युवा रक्तदाता संघटना व सामाजिक बांधिलकीच्या पाठपुराव्याला यश!
सावंतवाडी : गेल्या दीड वर्षांपासून रखडलेला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या शवागृह दुरुस्ती तसेच शौचालय, स्वच्छतागृह आणि ड्रेनेज नूतनीकरणाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. जिल्हा नियोजनमधून यासाठी निधी मंजूर झाला असून, सार्वजनिक बांधकाम विभागाला हे काम तातडीने सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आले आहेत. यामुळे युवा रक्तदाता संघटना आणि सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान यांच्या अथक पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे.
गेल्या दीड वर्षांपासून तांत्रिक अडचणींमुळे हे अत्यावश्यक काम रखडले होते, ज्यामुळे रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. रुग्णांचे हाल लक्षात घेऊन युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी आणि सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव यांनी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या भेटीदरम्यान ही समस्या त्यांच्या निदर्शनास आणली होती. तसेच, त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता महेंद्र किणी आणि वैभव सगरे यांची भेट घेऊन या कामासाठी आग्रही मागणी केली होती.
याचबरोबर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांनीही शासनाकडे या कामासाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. या सर्व प्रयत्नांनंतर शासनाकडून या कामासाठी निधी मंजूर करण्यात आला असून, जिल्हाधिकारी कार्यालयाने सार्वजनिक बांधकाम विभागाला पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत, ज्यामुळे हे संपूर्ण काम आता पूर्णत्वाकडे येत आहे.
या महत्त्वपूर्ण यशाबद्दल युवा रक्तदाता संघटना आणि सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान यांनी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार दीपक केसरकर यांचे विशेष आभार मानले आहेत. रुग्णालयातील या सुधारणांमुळे रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठा दिलासा मिळणार आहे.











