कावळेसाद पॉईंटला ‘फ्लॉवर व्हॅली’चे स्वरूप

एक झाड मातृभूमीसाठी या भाजपच्या उपक्रमांतर्गत साकारणार प्रकल्प

सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी तालुक्यातील पावसाळी पर्यटनासाठी महत्त्वाचे केंद्र असलेल्या आंबोली कावळेसाद पॉईंटला आता ‘फ्लॉवर व्हॅली पॉईंट’ म्हणून विकसित केले जात आहे. भाजप युवा नेते संदीप गावडे यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येत असलेल्या या अनोख्या उपक्रमामुळे येत्या दोन वर्षांत हा पॉईंट रंगीबेरंगी फुलांनी बहरलेला दिसेल, ज्यामुळे सावंतवाडीच्या पर्यटनाला एक नवीन आयाम मिळणार आहे.

या उपक्रमाचा शुभारंभ संकल्प सोडल्यानंतर अवघ्या काही तासांतच भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी १०० हून अधिक विविध प्रकारची रोपे या भागात लावण्यात आली. ‘एक झाड मातृभूमीसाठी’ या भाजप महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखालील उपक्रमांतर्गत हा प्रकल्प साकारण्यात येत आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, आंबोली वनक्षेत्रपाल प्रमिला शिंदे, सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, वनस्पती तज्ञ निखिल कुलकर्णी, बाबा काणेकर, मनोज नाईक, रवी मडगावकर, आंबोली सरपंच सावित्री पालेकर, केसरी उपसरपंच संदीप पाटील, प्रदीप दळवी, दया परब, अनिकेत आसोलकर आदींचा समावेश होता. आंबोली, चौकुळ आणि गेळे भागातील ग्रामस्थांनीही या उपक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली.

जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी संदीप गावडे यांच्या कार्याचे कौतुक केले. ते म्हणाले की, “संदीप प्रत्येक कार्यक्रम नाविन्यपूर्ण पद्धतीने राबवतो. केवळ प्रसिद्धीसाठी नव्हे, तर खऱ्या तत्परतेने कार्यक्रम राबवून तो पूर्णत्वास घेऊन जाणे ही त्याची खासियत आहे. आजचा कार्यक्रम हे देखील त्याचेच एक उदाहरण आहे. जिल्ह्यातील प्रत्येक बुथने याचे उदाहरण घेऊन कार्यक्रम राबवणे गरजेचे आहे.” या उपक्रमामुळे सावंतवाडीच्या पर्यटन नकाशावर कावळेसाद पॉईंटला एक नवीन आणि आकर्षक स्थान प्राप्त होईल, असेही ते म्हणाले.

श्री. गावडे म्हणाले की, “पर्यटनाच्या दृष्टीने नेहमी गजबजलेल्या कावळेसादला एक वेगळी ओळख निर्माण होईल, यासाठी आम्ही ‘फ्लॉवर व्हॅली पॉईंट’ हा उपक्रम राबवला आहे. येथे लावण्यात आलेल्या झाडांच्या संगोपनाची आणि देखभालीची जबाबदारी देखील आम्ही घेणार आहोत.” येत्या दोन वर्षांत कावळेसाद पॉईंट रंगीबेरंगी फुलांनी भरलेला दिसेल, ज्यामुळे पर्यटनाच्या दृष्टीने त्याचे महत्त्व आणखी वाढणार आहे. भविष्यातही परिसरात अशाच प्रकारचे उपक्रम राबवून या भागाचा पर्यटन दृष्ट्या विकास साधण्याचा आणि त्यातून स्थानिक लोकांना रोजगार मिळवून देण्याचा आपला प्रयत्न असेल, असेही त्यांनी नमूद केले. हा उपक्रम सावंतवाडीच्या पर्यटन विकासाला चालना देणारा ठरेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.