शक्तिपीठ महामार्ग रेडी बंदराला जोडावा : केसरकरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

हत्तींच्या प्रश्नावर निष्क्रिय मुख्यवनसंरक्षक रामानुजन यांच्या हकालपट्टीची मागणी करणार

सावंतवाडी । प्रतिनिधी : समृद्धी महामार्गाप्रमाणे शक्तिपीठ महामार्गही रेडी बंदराला जोडण्यात यावा आणि त्यासाठी नव्याने सर्वेक्षण करण्यात यावे, अशी मागणी आपण लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याची माहिती आमदार दीपक केसरकर यांनी आज येथे दिली.

तसेच, दोडामार्ग तालुक्यातील वाढत्या हत्तींच्या प्रश्नावर निष्क्रिय ठरलेल्या कोल्हापूर मुख्य वनसंरक्षक रामानुजन यांची तातडीने हकालपट्टी करण्याची मागणी वनमंत्र्यांकडे करणार असल्याचेही आमदार केसरकर म्हणाले. आमदार श्री. केसरकर यांनी आज आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, दोडामार्ग तालुकाप्रमुख गणेश प्रसाद गवस आदी उपस्थित होते.

आमदार केसरकर यांनी सांगितले की, अलीकडील अवकाळी पावसामुळे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विजेचा प्रश्न निर्माण झाला होता. यावर तोडगा काढण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. किनारपट्टी भागातील वादळे लक्षात घेऊन त्या ठिकाणी भूमिगत वीजवाहिन्या (अंडरग्राउंड केबल) टाकण्याचे काम सुरू करण्यात आले असून, त्याचा फायदा किनारपट्टी भागाला होणार आहे. याच धर्तीवर सावंतवाडी-इन्सुली ते सासोली आणि वेंगुर्ला ते मळेवाडी या ठिकाणीही भूमिगत केबल टाकण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. या संदर्भात आपण वीज वितरण कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून, ते लवकरच प्रस्ताव सादर करणार आहेत. हा प्रस्ताव घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लवकरच भेट घेऊन भूमिगत केबलसाठी मागणी करणार असल्याचे केसरकर यांनी सांगितले. सावंतवाडी शहर आणि कणकवली शहरातही भूमिगत केबल संदर्भात विचार केला जाणार असून, याबाबत पालकमंत्री नितेश राणे यांच्याशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचा ठरणारा शक्तिपीठ महामार्ग थेट गोव्याला जोडणार आहे. मात्र, तो थेट गोव्याला न जोडता समृद्धी महामार्ग ज्याप्रमाणे मालवण बंदराला जोडला जाणार आहे, त्याचप्रमाणे शक्तिपीठ महामार्ग रेडी बंदराला जोडण्यात यावा, यासाठी पुन्हा सर्वेक्षण व्हावे अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करणार आहोत. तसा निर्णय झाल्यास जिल्ह्यामध्ये पर्यटन क्रांती घडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शक्तिपीठ महामार्ग गेलोपासून अडवेपर्यंत भुयारी (सुरंग) असल्याने जंगलतोडीचा प्रश्नच येणार नाही, असेही ते म्हणाले.

सावंतवाडी तालुक्यातील आरोग्याच्या प्रश्नाबाबतही आपण सकारात्मक असून, लवकरच जिल्हा शल्य चिकित्सक व संबंधित अधिकाऱ्यांशी बैठक घेणार असल्याचे केसरकर यांनी सांगितले. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये फिजिशियन मिळावा यासाठी आपली आग्रही मागणी आरोग्यमंत्र्यांकडे राहणार आहे. सध्या डायलिसिसची सुविधा उपलब्ध असलेल्या सावंतवाडी प्रमाणेच लवकरच वेंगुर्ला आणि दोडामार्ग येथेही ही सुविधा सुरू करण्यात येणार आहे. येथे येणाऱ्या डॉक्टरांना अतिरिक्त वेतन सीएसआर फंडातून देण्यासाठी आपला प्रयत्न राहणार असून, आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यासाठी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचीही भेट घेतली असल्याचे त्यांनी सांगितले.मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल संदर्भात राजघराण्याकडून सही झाल्यानंतर कामास सुरुवात होईल, अशी माहितीही त्यांनी दिली.

हत्तींचा प्रश्न आणि वनसंरक्षकांवर निशाणा:
दोडामार्ग तालुक्यातील हत्तींचा प्रश्न दिवसेंदिवस वाढत असून, मुख्य वनसंरक्षक रामानुजन यांच्या निष्क्रियतेमुळेच हा प्रश्न अधिक वाढला असल्याचा आरोप आमदार केसरकर यांनी केला. त्यामुळे त्यांची येथून तात्काळ हकालपट्टी व्हावी अशी मागणी आपण वनमंत्र्यांकडे करणार आहोत. या ठिकाणी हत्तींबरोबरच वन्य प्राण्यांचा प्रश्न वाढत असताना त्यावर आळा घालण्याऐवजी येथील कातव्यवसायिकांना तसेच अन्य व्यावसायिकांना त्रास देण्याच्या कामात रामानुजन व्यस्त असल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे त्यांच्या बदलीची मागणी करणार असल्याचे ते म्हणाले.

आगामी निवडणुका आणि युतीचा विचार:
आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत समिती आदी निवडणुका युतीच्या माध्यमातून एकत्र लढाव्यात अशी आपली इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात महायुतीची सत्ता असल्याने या ठिकाणी होणारी विकास कामांची भूमिपूजने ही युतीच्याच माध्यमातून व्हावी अशी आपली भावना आहे. जे कोणी यामध्ये खोडसाळपणा करतील, त्यांची हकालपट्टी भविष्यात लोकच करतील. याआधीही अशाप्रकारे वागणाऱ्यांना लोकांनी घरी बसवले आहे, असेही केसरकर यांनी सूचित केले.