कोकणातील साकव दुरुस्तीसाठी विशेष आराखडा

गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत आराखड्यासाठी मंत्रालयात बैठक

खेड (प्रतिनिधी)कोकणातील साकवांच्या दुरुस्ती आणि विकासासाठी ठोस उपाययोजना करण्याच्या दृष्टीने गृहराज्य मंत्री ना. योगेश कदम यांच्या उपस्थितीत मुंबईत मंत्रालयात एक महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीत गावनिहाय सविस्तर माहिती संकलन करून साकव दुरुस्तीचा विशेष आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले.

 

बैठकीला ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव श्री. एकनाथ डवले हे उपस्थित होते, तर कोकण विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभाग घेतला. तसेच रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संबंधित बांधकाम विभागांचे अधिकारीही या बैठकीस उपस्थित होते.

 

या बैठकीदरम्यान ना. कदम यांनी सांगितले गावनिहाय साकवांची सविस्तर माहिती संकलित करणे आवश्यक आहे. कोकण विभागासाठी स्वतंत्र विभागीय आराखडा तयार करावा. नवीन लेखाशीर्ष निर्माण करून आर्थिक तरतूद निश्चित करणे आवश्यक आहे.

 

साकवांची उंची लक्षात घेऊन त्यांचे रूपांतर पुलांमध्ये करता येईल, अशा प्रकारचा आराखडा तयार करणे गरजेचे आहे. कोकण विभागातील पावसाळ्यातील दळणवळणाचा प्रश्न लक्षात घेता साकांचे मजबुतीकरण आणि आवश्यकतेनुसार त्यांचे रूपांतर हे प्राधान्याने केले जाणार आहे. या उपक्रमामुळे कोकणातील ग्रामीण भागातील नागरिकांना सुरक्षित आणि अखंड वाहतूक सुविधा उपलब्ध होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

या बैठकीत घेतलेल्या निर्णयांमुळे कोकणातील मूलभूत पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना मिळणार असून, ग्रामविकासाच्या दृष्टीने हा एक महत्वाचा टप्पा ठरणार आहे