दिव्यांग बांधव १२ जून रोजी लांजा तहसीलदार कार्यालयावर धडकणार 

बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठींबा 

लांजा (प्रतिनिधी) शेतकरी आणि दिव्यांगांच्या विविध प्रश्नांवर सरकारचं लक्ष वेधण्यासाठी बच्चू कडू यांचं गेल्या चार दिवसांपासून अमरावती जिल्ह्यातील गुरूकुंज मोझरी येथे अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. बुधवारी चौथ्या दिवशी बच्चू कडू यांची प्रकृती बिघडल्याने हे आंदोलन चिघळले असून या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी लांजा तालुक्यातील दिव्यांग बांधव गुरुवार १२ जून रोजी सकाळी ११ वाजता लांजा तहसीलदार कार्यालयावर धडक देणार आहेत.

गेल्या चार दिवसांपासून दिव्यांग बांधवांचे तारणहार राज्याचे माजीमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांचे अमरावती येथे अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाची दखल सरकारच्यावतीने घेण्यात आलेली नाही, तसेच बच्चू कडू यांची प्रकृती बिघडल्याने आंदोलन चिघळले असून सरकारच्या विरोधात दिव्यांग बाधवांमधून प्रचंड रोष व्यक्त केला जात आहे.

या पार्श्वभूमीवर प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेच्यावतीने तालुक्यातील तमाम दिव्यांग बांधव गुरुवार १२ जून रोजी सकाळी ११ वाजता लांजा तहसीलदार कार्यालयावर धडक देऊन महाराष्ट्र शासनाचा विरोध करणार आहेत. त्याचप्रमाणे तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात येणार आहे.

दरम्यान, बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा तसेच लांजा तहसीलदार यांना निवेदन देण्यासाठी जास्तीतजास्त दिव्यांग बांधवांनी संघटना, गटतट बाजूला ठेवून एक दिव्यांग म्हणून लांजा तहसीलदार कार्यालयात गुरुवारी सकाळी उपस्थित रहावे असे आवाहन रत्नागिरी जिल्हा प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेचे जिल्हाध्यक्ष आनंद त्रिपाठी यांनी केले आहे.