सावंतवाडी:
जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, मतदारांमध्ये मतदानाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी सावंतवाडी तहसीलदार कार्यालयात ‘वोटर सेल्फी पॉईंट’ उभारण्यात आला आहे. ‘आपले एक मत देशाचे भविष्य घडवू शकते, जबाबदार नागरिक बना, मतदान करा’ असा संदेश देणाऱ्या या सेल्फी पॉईंटचे लोकार्पण निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी समीर घारे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार सावंतवाडी तालुक्यातील मतदारांना मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी प्रशासन विविध उपक्रम राबवत आहे. याचाच एक भाग म्हणून आज सेल्फी पॉईंटचे उद्घाटन झाले. यावेळी बोलताना समीर घारे म्हणाले की, जास्तीत जास्त लोकांनी मतदानाचा हक्क बजावावा यासाठी हे पाऊल उचलले आहे. तसेच आगामी काळात तालुक्यातील गावागावात जाऊन स्वाक्षरी मोहीम राबवली जाणार असून, त्याद्वारे व्यापक जनजागृती केली जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली.
या कार्यक्रमाला सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार श्रीधर पाटील, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, निवडणूक नायब तहसीलदार श्रीम. तारी, कर निर्धारक अधिकारी प्राची पाटील आणि बांदेकर कॉलेजचे तुकाराम मोरजकर यांसह इतर कर्मचारी उपस्थित होते.











