लांजा शहरातील रखडलेल्या महामार्गाच्या कामाने महादेव कुळ्ये यांच्या रूपाने घेतला पहिला बळी 

एसटीच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या शिरवली येथील वृद्धाचा अखेर मृत्यू

लांजा (प्रतिनिधी) एसटी बसच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या तालुक्यातील शिरवली येथील महादेव गुणाजी कुळ्ये (वय ६८) यांचा मुंबई येथे आज बुधवारी ११ जुन रोजी पहाटे ५.३० वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे .त्यांच्या रूपाने मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाने लांजात पहिला बळी गेला आहे .

लांजा शहरातील मुंबई गोवा महामार्गाचे काम हे अनेक वर्षे रखडलेल्या स्थितीत आहे. मे महिन्यात पडलेल्या मान्सूनपूर्व पावसात लांजा शहरात सर्विस रोड नसल्याने नागरिकांसह वाहन चालकांची प्रचंड गैरसोय झाली होती. सध्या या सर्विस रोडचे कामे वेगाने सुरू असले तरी यापूर्वीच ही कामे होणे अपेक्षित होते.लांजा शहरातील रखडलेले महामार्गाचे काम आणि सर्विस रोडच्या कामामुळे मे महिन्यात पडलेल्या पावसात शहरात बिकट अवस्था निर्माण झाली होती .

यातूनच लांजा तालुक्यातील शिरवली पलीकडची वाडी येथील रहिवासी असलेले ६८ वर्षीय महादेव गुणाजी कुळ्ये हे शनिवार दिनांक ३१ मे रोजी लांजा येथे खरेदीसाठी आले होते. मात्र लांजा बस स्थानकाच्या प्रवेशद्वारात रत्नागिरी कणकवली या एसटी बसची त्यांना धडक बसून ते गंभीर जखमी झाले होते. या अपघातात त्यांच्या दोन्ही पाय तसेच कंबरेवर गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर त्यांना अधिक उपचारसाठी रत्नागिरी आणि त्यानंतर मुंबई येथे दाखल करण्यात आले होती .मुंबई येथे उपचार सुरू असताना आज बुधवारी ११ जून रोजी पहाटे ५.३० वाजता त्यांचा मृत्यू झाला आहे .

वाहनांची असलेली प्रचंड रहदारी त्यात एकेरी वाहतूक, सर्विस रोड नसल्याने बसस्थानक परिसरात होणारी वाहनांची प्रचंड गर्दी, अपुरा रस्ता यामुळेच अशा प्रकारचा अपघात हा झाला होता. त्यामुळे एक प्रकारे मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामानेच महादेव कुळ्ये यांचा बळी गेला आहे.