सावंतवाडी । प्रतिनिधी : कर्नाटक येथे बेळगाव बुद्धिबळ असोसिएशनने आयोजित केलेल्या “ऑल इंडिया क्लासिकल रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत” सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बाळकृष्ण पेडणेकरने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत नववा क्रमांक पटकावला. तीन दिवस चाललेल्या या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत देशभरातून ४५३ खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
सावंतवाडीतील मुक्ताई ॲकॅडमीचे विद्यार्थी बाळकृष्ण पेडणेकर, मयुरेश परुळेकर, यथार्थ डांगी, विभव राऊळ, चिदानंद रेडकर आणि पुष्कर केळूसकर यांनी स्पर्धेत सहभाग घेऊन लक्षवेधी कामगिरी केली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रथम क्रमांकाचा २० वर्षीय राष्ट्रीय खेळाडू बाळकृष्ण पेडणेकर याने या स्पर्धेत आपले निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. विशेष म्हणजे, संपूर्ण स्पर्धेत बाळकृष्ण अपराजित राहिला. त्याने नऊ राऊंडपैकी सहा राऊंड जिंकले आणि तीन राऊंड बरोबरीत सोडवत एकूण ७.५ गुण मिळवले. क्लासिकल, रॅपिड आणि ब्लिट्ज या तिन्ही प्रकारात बाळकृष्णने सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय रेटिंग मिळवले आहे.
शालेय बुद्धिबळ स्पर्धेत बाळकृष्ण राज्यस्तरीय निवड चाचणीसाठी चार वेळा आणि राष्ट्रीय निवड चाचणीसाठी दोन वेळा निवड झालेला कोकणातील एकमेव खेळाडू आहे. याव्यतिरिक्त, जागतिक विजेता विश्वनाथ आनंद यांच्या पुणे येथील बुद्धिबळ कोचिंग कॅम्पसाठी निवड झालेल्या २०० खेळाडूंमध्ये बाळकृष्ण पेडणेकर हा कोकणातील एकमेव खेळाडू होता.
या स्पर्धेत ॲकॅडमीचा १९ वर्षीय मयुरेश परुळेकर याने (५० टक्के दृष्टीदोष असूनही) आपल्या गटात प्रथम क्रमांक पटकावला. यापूर्वीही मयुरेशने राष्ट्रीय स्तरावरील आणि युनिव्हर्सिटीच्या महाविद्यालयीन स्पर्धेत उत्कृष्ट खेळ करत अनेक पारितोषिके मिळवली आहेत. १३ वर्षीय यथार्थ डांगी या विद्यार्थ्याने प्रथमच या स्पर्धेत सहभाग घेऊन चांगला खेळ केला आणि आंतरराष्ट्रीय रेटिंग मिळवले. गेल्या दहा वर्षांत ॲकॅडमीच्या तब्बल २३ विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय रेटिंग मिळवले आहे.
मुक्ताई ॲकॅडमीचे अध्यक्ष व प्रशिक्षक श्री. कौस्तुभ पेडणेकर आणि राष्ट्रीय प्रशिक्षक श्री. उत्कर्ष लोमटे सर यांच्या मार्गदर्शनाखाली या विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले आहे. युवराज लखमराजे भोंसले यांनी या विद्यार्थ्यांचे कौतुक केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.













