खेड च्या तत्कालीन उपविभागीय अधिकारी राजश्री मोरे यांच्या दिशाभूल करणाऱ्या अहवालाविरोधात संघर्ष मंचकडून तक्रार

खेड(प्रतिनिधी) खेड तालुक्यातील सुकिवली देऊळवाडी येथील संघर्ष मंचचे सदस्य श्री. दीपक चाळके यांनी जिल्हाधिकारी व अपर जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांच्याकडे एक गंभीर तक्रार सादर केली आहे. या तक्रारीत त्यांनी तत्कालीन उपविभागीय अधिकारी श्रीमती राजश्री मोरे यांच्यावर उमा वुड या कंपनी प्रकरणी सादर केलेल्या अहवालामध्ये जाणूनबुजून चुकीची व दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप केला आहे.

 

तक्रारीनुसार, तत्कालीन उपविभागीय अधिकारी मोरे यांनी त्यांच्या अहवालात असा दावा केला आहे की महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ ने उमा वुड इंडस्ट्रीजला चालू ठेवण्याची परवानगी दिली आहे. परंतु, ०६ ऑक्टोबर २०२१ रोजी कंपनीला पाठवलेल्या अधिकृत पत्रामध्ये आपला उद्योग तत्काळ बंद करण्यात का येऊ नये?

आपण संबंधित कायद्यांच्या तरतुदींचे पालन करेपर्यंत, सक्षम अधिकाऱ्यांना आपला पाणी/वीज पुरवठा खंडित करण्याचे निर्देश का देऊ नयेत?

 

उक्त पत्रातून स्पष्ट होते की प्रदूषण नियंत्रण मंडळाने न कोणतीही सेवा चालू ठेवण्याची परवानगी दिली नव्हती, तर उलटपक्षी कंपनीवर बंदी घालण्याच्या दिशेने कार्यवाही सुरू करण्याचा विचार केला जात होता. त्यामुळे श्रीमती मोरे यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळा च्या स्पष्ट आणि गंभीर निर्देशांचे अपूर्ण व विपर्यस्त सादरीकरण केले, जे प्रशासकीयदृष्ट्या गंभीर दुर्लक्ष आणि दिशाभूल करणारे आहे.

 

श्री. चाळके यांनी असेही नमूद केले की, सदर अहवालात अनेक महत्त्वाचे तथ्य मुद्दाम वगळण्यात आले आहेत, जे निश्चितच स्वार्थी हेतूने केले गेले असावेत. या कृतीमुळे प्रशासनामध्ये गोंधळ निर्माण झाला असून, ती अपारदर्शक व दुर्भावनायुक्त असल्याचा संशय निर्माण होतो.

 

त्यांनी प्रशासनाकडे श्रीमती राजश्री मोरे यांच्याविरोधात विभागीय चौकशी तातडीने सुरू करण्यात यावी. प्रदूषण नियंत्रण मंडळा च्या स्पष्ट पत्राचा विपर्यस्त अर्थ लावून दिलेल्या चुकीच्या माहितीबद्दल त्यांच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात यावी.

त्या सध्या महसूल विभागात कार्यरत नसल्यासही, शासन नियमांनुसार आवश्यक ती कारवाई करण्यात यावी. ही बाब केवळ वैयक्तिक दुर्लक्ष नाही, तर प्रशासनातील पारदर्शकतेवर घाला आहे. या प्रकाराची तात्काळ दखल घेणे आवश्यक आहे, अशी भूमिका संघर्ष मंचने मांडली आहे.।