अपना भिडु, बच्चु कडू घ्या घोषणांनी तहसील कार्यालय परिसर दणाणला

दिव्यांगांच्या प्रश्नांवर बच्चू कडू यांच्या आंदोलनाला लांजात दिव्यांग बांधवांचा एकजूटीने पाठिंबा

लांजा (प्रतिनिधी) शेतकऱ्यांची कर्ज माफी झालीच पाहिजे.. दिव्यांगांची पेंशन ६ हजार झालीच पाहिजे.. अपना भिडु, बच्चु कडू.. या घोषणांनी गुरुवारी लांजा तहसीलदार कार्यालय परिसर दणाणून गेला. निमित्त होते ते शेतकरी आणि दिव्यांगांच्या विविध प्रश्नांवर सरकारचं लक्ष वेधण्यासाठी बच्चू कडू यांनी अमरावतीमध्ये सुरु केलेल्या अन्नत्याग आंदोलनाला लांजातील दिव्यांग बांधवांनी दिलेल्या पाठिंब्याचे.

गेल्या पाच दिवसांपासून अमरावती जिल्ह्यातील गुरूकुंज मोझरी येथे बच्चु कडू यांचे अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. बुधवारी चौथ्या दिवशी बच्चू कडू यांची प्रकृती बिघडल्याने हे आंदोलन चिघळले असून या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी लांजा तालुक्यातील दिव्यांग बांधव यांनी गुरुवार १२ जून रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास लांजा तहसीलदार कार्यालयाच्या परिसरात जोरदार घोषणा देत तहसीलदार प्रियंका ढोले यांना निवेदन सादर केले.

या निवेदनात म्हंटले आहे की, गेल्या चार दिवसांपासून दिव्यांग बांधवांचे तारणहार राज्याचे माजीमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांचे अमरावती येथे अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाची दखल सरकारच्यावतीने घेण्यात आलेली नाही, बच्चू कडू यांची प्रकृती बिघडल्याने दिव्यांग बाधवांमधून सरकारच्याविरोधात प्रचंड रोष व्यक्त केला जात आहे. तसेच लांजा तालुक्यातील दिव्यांग बांधवांचा बच्चु कडू यांच्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा असून सरकारने दिव्यांगांच्या तीव्र भावना समजून घेत तातडीने आंदोलनाची दखल घ्यावी.

 

यावेळी तहसीलदार यांना निवेदन देताना प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष आनंद त्रिपाठी यांच्यासह लांजा तालुका राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रकाश लांजेकर, शिवसेना ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख प्रकाश करंबेळे, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे लांजा तालुका युवक अध्यक्ष बाबा धावणे, पदाधिकारी दाजी गडहिरे, लांजा लाकूड व्यापारी संघटनेचे अध्यक्ष फारुख नेवरेकर तसेच दिव्यांग जनकल्याण संस्थेचे संजय सुर्वे आदींसह इतर दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.