राजापुरात मुसळधार पडलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना

राजापूरात एकुण ४०.२५ मिमी पावसाची नोंद

राजापूर (वार्ताहर): आठवडा भराच्या विश्रांतीनंतर सक्रीय झालेल्या मान्सुनने गुरूवारी राजापूर शहरासह ग्रामिण भागात जोरदार हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह मुसळधार पडलेल्या पावसात ग्रामिण भागात अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत. तर मुसळधार पावसामुळे अर्जुना आणि कोदवली नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे.

मे मध्ये झालेल्या मान्सुनपुर्व पावसानंतर मधल्या काळात पावसाने विश्रांती घेतली होती. ७ जून पासून मान्सुन सर्वत्र सक्रीय झाला असून बुधवार आणि गुरूवारी राजापूर तालुक्यात जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. राजापूरात एकुण ४०.२५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

या पावसामुळे अर्जुना आणि कोदवली नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली तर काही ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. यामध्ये सागवे ठुकरूलवाडी येथे रस्ता खचला असून सागवे जंबारी शाळेजवळील् संरक्षण भिंत कोसळली आहे. तर देवाचे गोठणे येथे अंडर ग्राऊंड केबलसाठी खोदण्यात आलेल्या रस्त्याची पुरती दुरावस्था झाली आहे. तर ताम्हाणे पहिलीवाडी येथे रस्त्यावर झाड कोसळून वाहतुक ठप्प झाली. शहरातील धोपेश्वर साखळकरवाडी रस्त्यावर बांधी कोसळली आहे.

शहरासह ग्रामिण भागात पावसामुळे झालेल्या पडझडीबाबत तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश तहसिलदार विकास गंबरे यांनी दिले आहेत.