चिपळूण (प्रतिनिधी) : चिपळूणमधील दोन गृहिणी सौ. विशाखा सदानंद चितळे आणि सौ मानसी वामन जोशी या दोघींनी काही महिन्यांपूर्वी पायी नर्मदा प्रदक्षिणा पूर्ण केली. त्यांचा सन्मान आणि त्यांचे अनुभव कथन असा कार्यक्रम चिपळूणच्या ब्राह्मण सहाय्यक संघाने बुधवार दि.११ जून रोजी सायंकाळी ५.४० वाजता आयोजित केला होता.
प्रारंभी दोन्ही उत्सव मूर्ती आणि त्यांच्याशी संवाद साधणारे धनंजय चितळे यांनी श्रीदेव वीरेश्वराचे दर्शन घेतले. श्री. केतकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सौ. चितळे आणि सौ. जोशी आणि धनंजय चितळे यांनी मैया नर्मदेचे पूजन केले. पेढ्यांचा प्रसाद दाखविला त्यानंतर ह.भ.प.मा शरद तांबे यांनी नर्मदाषटक म्हंटले. उपस्थित श्रोतृ वर्गानेही सहभाग घेतला. सौ. चितळे आणि सौ. जोशी यांची ओटी भरून त्यांना शाल, पुष्प, श्रीफळाने सन्मानित केले. संघाच्या महिला विभाग अध्यक्ष सौ. सुरंगा अभ्यंकर आणि संघाच्या संचालक सदस्य सौ. रेखा बापट यांनी त्यांना सन्मानित केले. धनंजय चितळे यांना संघाचे अध्यक्ष अविनाश पोंक्षे यांनी श्रीफळ आणि पुष्प देऊन सन्मानित केले.
मुलाखतीच्या आरंभी श्री. चितळे यांनी नर्मदा परिक्रमा का? आणि कशी करतात ते वर्णन केले, नदीचा प्रवाह उजवीकडे ठेऊन ही प्रदक्षिणा करतात हेसांगितले. मग दोघींनी आपल्या परीक्रमे दरम्यान आलेले अनुभव कथन केले. रोज १५/२० किलोमीटर पायी प्रवास त्या करीत असत. मार्गावर असलेल्या आश्रमामध्ये त्या दुपारी आणि रात्री भोजन आणि विश्रांती. घेत. तेथील लोक त्यांना प्रेमाने सहकार्य करीत. सकाळी उठून आवरून पूजन करीत चालताना सदैव मैयाचा जप स्तोत्र सुरु असे. वाटेत भेटणारे लोक त्यां प्रेमादराने चहा पाणी न्याहारीसाठी बोलावीत असत. आणि पैशांची अपेक्षाही करीत नसत. वाटेत चालणारे सहप्रवासी सर्व प्रकारची मदत करून सहकार्य करीत. वाटेत सुंदर पवित्र ठिकाणे पहावयास मिळाली. कायम थंड पाण्याने आंघोळ मिळेल त्या पाण्याने कपडे धुणे आणि वाळविणे हे करावे लागे. प्रवासात स्वतःचे समान स्वतःच न्यावे लागत असल्याने कपडेही मर्यादित होते. पण मैयाच्या कृपेने कोठेही अडचण आली नाही प्रवासा दरम्याने आजारीही पडल्या नाहीत म्हणून परिक्रमा सुखद झाली. आणखीही खूप अनुभव कथन केले. काही चमत्कारा सारखेही अनुभव आले. धनंजय चितळे त्यांना विविध प्रश्न विचारून अनुभव कथनाला दिशा देत होते. चिपळूणमध्येच राहणारे प्रकाश काळे यांनी गतवर्षी पायी नर्मदा परिक्रमा केली होती, त्यांनाही निमंत्रित केले होते आणि त्यांचाही सन्मान संघाचे संचालक वे.मु. संजय जोशी यांचे हस्ते करण्यात आला.
सुमारे दीड तास अनुभव कथन केल्यावर मुलाखातीला पूर्णविराम दिला. नर्मदेची आरती झाली. त्यांनी आणलेले तीर्थ आणि प्रसाद म्हणून पेढे वाटप झाले. कार्याध्यक्ष डॉ. मेहेंदळे यांनी आभार प्रदर्शन केले. सर्वांनी कॉफीपान केल्यावर कार्यक्रमाची सांगता झाली. सुमारे ९० चिपळूणकर या कार्यक्रमाला उपस्थित होते.











