लांजा पोलिसांची सापुचेतळे येथे धडक कारवाई 

विदेशी तसेच गावठी हातभट्टीच्या दारू विक्री करणाऱ्याला घेतले ताब्यात 

लांजा( प्रतिनिधी) विनापरवाना गावठी तसेच विदेशी मद्याची विक्री करणाऱ्या व्यक्तीला लांजा पोलिसांनी धाड टाकून ताब्यात घेतले आहे. या कारवाईत एकूण १२३९० रुपयांचा दारूसाठा जप्त करण्यात आला आहे. गुरुवारी १२ जून रोजी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली .

तालुक्यातील सापुचेतळे लिंबूचीवाडी येथे एकजण विनापरवाना आणि बेकायदा गावठी तसेच विदेशी दारूची विक्री करत असल्याची खबर लांजा पोलिसांना मिळाली होते.त्यानुसार लांजा पोलिसांनी काल गुरुवारी १२ जून रोजी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास सापूचेतळे लिंबूचीवाडी येथे धाड टाकली यावेळी त्या ठिकाणी राकेश रामचंद्र गोरे (वय २९, राहणार वाडीलिंबू सातूचेतळे) हा आपल्या काम चालू असलेल्या घरात विनापरवाना गावठी तसेच विदेशी मद्याच्या विक्रीसह आढळून आला.

या कारवाईत लांजा पोलिसांनी १२८० रुपये किमतीचे मॅकडॉल लेबल असलेल्या १८० मिलि मापाच्या आठ बाटल्या, १७१० रुपये किमतीच्या रॉयलस्टॅग लेबल असलेल्या १८० मिली मापाच्या नऊ बाटल्या, ९५० रुपये किमतीच्या रॉयल चॅलेंज लेबल असलेल्या १८० मिली मापाच्या पाच बाटल्या, ८५० रुपये किमतीच्या मॅकडॉल लेबल असलेल्या ९० मिलि मापाच्या दहा सीलबंद बाटल्या तसेच ६०० रुपये किमतीच्या रॉयल चॅलेंज लेबल असलेल्या ९० मिलि मापाच्या सहा बाटल्या यासह ७००० रुपये किमतीची गावठी हातभट्टीची दारू प्लास्टिक बॉटल मधील कॅन मध्ये ओतून घेतलेली दहा लिटर मापाची तीन कॅन असे दहा लिटर मापाचे कॅन एकूण ७० लिटर दारू असा एकूण १२,३९० रुपयांचा दारू साठा पोलिसांनी जप्त केला.

विनापरवाना गावठी व विदेशी दारूच्या विक्री प्रकरणी लांजा पोलिसांनी राकेश गोरे यांच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे .याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल नासिर नावळेकर हे करत आहेत.