सोनुर्लीकडे जाणाऱ्या निरवडे-वेत्ये मार्गाची दुरवस्था

ग्रामस्थांकडून तातडीने दुरुस्तीची मागणी

सावंतवाडी । प्रतिनिधी :
निरवडे आणि वेत्येमार्गे सोनुर्ली गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची सध्या प्रचंड दुरवस्था झाली आहे, ज्यामुळे वाहनचालक आणि ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून ग्रामीण भागातील रस्ते नव्याने तयार केले जात असले तरी, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठेकेदाराच्या योग्य नियोजनाअभावी या रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

या रस्त्यावर अनेक ठिकाणी साईड पट्ट्या खचल्या आहेत, तर काही ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे अपघातांची शक्यता वाढली असून, विशेषतः निरवडे आणि वेत्ये मार्गे प्रवास करणाऱ्यांसाठी हा रस्ता धोकादायक बनला आहे. वेत्ये मार्गे सोनुर्ली गावात जाणाऱ्या रस्त्यावर रेल्वे ब्रीजजवळच्या रस्त्याची स्थिती अत्यंत वाईट आहे. या ठिकाणी पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांचे अपघात होण्याची तीव्र शक्यता आहे. त्यामुळे, रेल्वे ब्रीजजवळील हे खड्डे तातडीने भरण्याची मागणी वाहनचालक आणि ग्रामस्थांकडून जोर धरत आहे.

जर या रस्त्याची आणि विशेषतः रेल्वे ब्रीजजवळील खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती न झाल्यास, सोनुर्ली गावचे सामाजिक कार्यकर्ते संदीप गावकर यांनी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.