मात्र गोठा जमिनदोस्त
गोठ्याच्या भिंतींचे चिरे फेकले गेले दहा ते पंधरा फूट आणि वासेदेखील उडाले १२ फूट
संतोष कोत्रे l लांजा-: तालुक्यातील भडे गावात एक अकल्पित आणि विचार करण्यासारखी गोष्ट घडली आहे. गोठ्यावर ना झाडे पडली ना प्रचंड पाऊस. ना वादळी वारा. तरीही गुरांचा गोठा झाला जमीनदोस्त. इतकेच नाही तर गोठ्याच्या भिंतीचे चिरे उडाले १० ते १५ फूट आणि गोठ्यावरील वासे देखील उडाले १२ फूट लांब अंतरावर. सारे काही अकल्पित आणि धक्कादायक या घटनेने खुद्द गोठा मालक संजय सुर्वे हे देखील चक्रावून गेले आहेत.
शुक्रवारी लांजा तालुक्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात पाऊस पडला होता. त्यामुळे सर्वत्र दाणादाण उडालेली आहे .असे असले तरी भडे गावात घडलेली घटना मात्र साऱ्यांना चक्रावून टाकणारी आहे. विचार करायला लावणारी आहे. भडे येथील भजनी बुवा असलेले संजय सुर्वे यांचा घरालागतच चिरेबंदी गोठा आहे. हा गोठा शुक्रवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास अचानकपणे कोसळला नव्हे तर पूर्णपणे जमीनदोस्त झाला. या गोठ्यात गुरे असली तरी ती या घटनेतून बचावली आहेत.
मात्र यात चक्रावून टाकणारी आणि अकल्पित अशी घटना समोर आली आहे. या घटनेने खुद्द गोठा मालक संजय सुर्वे हे देखील चक्रावून गेले आहेत. शुक्रवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास त्यांचा हा चिरेबंदी गोठा अचानकपणे जमीनदोस्त झाला. मात्र ना मुसळधार पाऊस किंवा वादळीवारा किंवा या गोठ्यावर कोणतेही झाड पडलेले नसताना देखील हा गोठा जमीनदोस्त झाला आहे. यात विशेष बाब म्हणजे या चिरेबंदी असणाऱ्या गोठ्याच्या भिंतींचे चिरे हे एखादा स्फोट व्हावा त्याप्रमाणे १५ ते २० फूट लांब उडाले आहेत. या खेरीज या गोठ्यावर असणारे मजबूत आणि चांगल्या दर्जाचे वासे म्हणजेच लाकडी बार हे देखील १२ फूट उडाले आहेत. त्यामुळे हा नेमका प्रकार काय आहे ? असा प्रश्न खुद्द मालक संजय सुर्वे यांना पडला आहे. ज्या पद्धतीने चिरे व वासे उडाले आहेत हे पाहून निश्चितच आश्चर्यकारक गोष्ट आहे
या संपूर्ण घटनेत गोठा मालक संजय सुर्वे यांचे सुमारे दीड ते दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तर घराच्या पाठीमागील बाजूला देखील थोडेफार नुकसान झाले आहे.













