मुसळधार पावसाचा गुहागरात अनेक ठिकाणी फटका

अनेक ठिकाणी पूर,तवसाळमध्ये रस्ता गेला वाहून

गुहागर l प्रतिनिधी :शनिवारी दुपारपासून मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने गुहागर तालुक्यातील काही गावांना अक्षरशः झोडपून काढले.पालशेतमध्ये मोठ्या प्रमाणात पूर येऊन भरवस्तीत तसेच बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात पाणी घुसले.

तालुक्यातील पालशेत येथील घरांमध्ये साधारणतः 16 घरांमध्ये तसेच 5 ते 6 दुकानात पाणी घुसले.तर संपूर्ण रस्त्यावर पाण्याचा महापूर जणू आला होता.यावेळी गुहागर तहसीलदार परीक्षित पाटील यांनी तत्काळ भेट दिली.आरे येथे रस्त्यावर झाड कोसळून वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.तर रोहिले ब्रिज ते तवसाळ रस्ता येथे एअरटेल व महावितरण यांच्या खोदाईमुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी येऊन रस्ताच वाहून गेला आहे. तर असगोली मधली वाडी येथे प्रदीप घुमे यांच्या घरासमोरील दगडी बांध कोसळला आहे.नरवण ग्रामपंचायत रोडवर झाड पडून एलटी वायर तुटल्या.कुडली येथे दिलीप ठोंबरे यांच्या घरावर आंबा कलमाचे झाड पडून पत्र्याचे नुकसान झाले.अडूर चिखलगाव येथे संरक्षक भिंत कोसळून शेतीमधून पाणी जाऊन शेतकऱ्यांचे नुकसान झाले.कोंडकारूळ येथे सावित्री मोरे यांच्या जुन्या घराची भिंत लगतच्या धनंजय मोरे यांच्या घराच्या भिंतीवर कोसळून घराच्या भिंतीचे व खिडकीचे नुकसान झाले आहे.तवसाळ खुर्द येथील जयेश गडदे यांच्या घराजवळचा बांध पावसाने खचला.तर साखरीआगर धरण वाडी येथे अभिजित माईन यांच्या घराशेजारी दरड पडली मात्र यामध्ये सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.