आर्ट ऑफ लिव्हिंगची सोमनाथ ज्योतिर्लिंग यात्रा १८ ला सावंतवाडीत

भाविकांसाठी रुद्रपूजा आणि दर्शन सोहळा : दर्शनासाठी आ. केसरकर यांचे आवाहन

सावंतवाडी: वैदिक धर्म संस्थान आणि दि आर्ट ऑफ लिव्हिंग सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने, आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक दर्शक हाथी जी यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या बुधवार, १८ जून रोजी एक अभूतपूर्व सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या मूळ सोरटी सोमनाथ ज्योतिर्लिंगाचा दर्शन सोहळा आणि रुद्रपूजा सावंतवाडीत पार पडणार आहे. श्रीधर अपार्टमेंट येथे हा ऐतिहासिक सोहळा दोन टप्प्यांत होणार आहे.

जवळपास १ हजार वर्षांनंतर प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यात हा दर्शन सोहळा होत असल्याने, नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन माजी शालेय शिक्षणमंत्री आमदार दीपक केसरकर यांनी केले आहे.

हा संपूर्ण सोहळा पूर्णपणे मोफत असून, तो सर्वांसाठी खुला आहे. या संदर्भात माहिती देताना श्री. केसरकर म्हणाले की, अकराव्या शतकात (इ.स. १०२६ मध्ये) क्रूर महमूद गझनीने सोमनाथ मंदिरावर हल्ला करून पवित्र शिवलिंगाचे तुकडे केले होते. परंतु, काही निष्ठावंत पुजाऱ्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता, त्या पवित्र अवशेषांचे रक्षण केले आणि पिढ्यानपिढ्या हे रहस्य जपले. सुमारे एक हजार वर्षे हे अवशेष गुप्त ठिकाणी सुरक्षित ठेवले गेले आणि भक्तांच्या श्रद्धेने त्यांना जिवंत ठेवले.

नियतीच्या खेळातून हे पवित्र अवशेष कालांतराने गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांच्यापर्यंत पोहोचले. काही संतांच्या मते, हा एक दैवी संकेतच होता. प्राचीन पुजारी-पुरोहितांच्या वंशजांनी हे पवित्र अंश गुरुदेवांना सुपूर्द केले. गुरुदेवांनी त्यांचे आध्यात्मिक महत्त्व ओळखून महाशिवरात्रीच्या भव्य सोहळ्यात या अंशांचा लिंगाभिषेक केला. हेच पवित्र शिवलिंग आता सावंतवाडीत भाविकांना दर्शनासाठी उपलब्ध होणार आहे.

कार्यक्रमाची रूपरेषा:

* स्थळ: श्रीधर अपार्टमेंट, एसटी स्टँड समोर, सावंतवाडी

* वेळ:

* सकाळी ९.०० ते १०.००: रुद्रपूजा

* सकाळी १०.३० ते १२.३०: दर्शन (रुद्रपूजा संकल्प)

मंगळवार, १७ जून रोजी कणकवली येथेही हा सोहळा होणार आहे. श्री. केसरकर यांनी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना या पवित्र दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक उमेश वायंगणकर, अशोक दळवी, विद्याधर परब, आर्ट ऑफ लिव्हिंगचे हर्षल नाडकर्णी, दीपा सावंत, आनंद पोयेकर, बाळकृष्ण सावंत, परिक्षित मांजरेकर, विनोद सावंत, बंटी पुरोहित, अर्चित पोकळे आदी मान्यवर उपस्थित होते.